बंगळुरू, १७ जानेवारी २०२४, प्रतिनिधी : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या वीस षटकांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगळुरू येथील एम. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणार आहे. हा सामना जिंकल्यास कर्णधार रोहित शर्मा याच्या नावावर एका नव्या विक्रमाची नोंद होणार आहे.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने ७२ पैकी ४१ वीस षटकांचे सामने जिंकले आहेत तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने आतापर्यंत ५३ पैकी ४१ वीस षटकांचे सामने जिंकले आहेत. रोहितच्या नेतृत्वात भारताने बंगळुरूचा सामना जिंकला तर ५४ पैकी ४२ वीस षटकांचे सामने जिंकत तो देशाचा सर्वाधिक यशस्वी वीस षटकांचा कर्णधार होणार आहे.
ही मालिका संपल्यावर भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटींची मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयपीएलला सुरुवात होईल. आयपीएल संपल्यानंतर काही दिवसांतच वीस षटकांची विश्वचषक स्पर्धा सुरू होणार आहे.