उत्तर प्रदेश, २४ जुलै २०२३, प्रतिनिधी: उत्तर प्रदेशातील वाराणासीतील ज्ञानवापी मशीद प्रकरणी एसआयच्या सर्व्हेवर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या मुस्लिम पक्षकारांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ज्ञानवापीतील सर्व्हेक्षणावर दोन दिवसाची स्थगिती देण्यात आली आहे. तसेच मशीद परिसरात आठवडाभर खोदकाम करण्यास सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. या प्रकरणाचा सर्वे अहवाल ४ ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे या सर्व्हे अहवालानंतर कोर्ट काय निर्णय देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
ज्ञानवापी मशीद संदर्भात कोर्टात काय घडलं?
जिल्हा न्यायालयाचा आदेश मानून पुरातत्व विभागाची टीम सर्व्हे करण्यासाठी ज्ञानवापी मशिद परिसरात गेली होती. या सर्व्हेसाठी चार पथके तयार करण्यात आले होते. चारही टीम वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी गेल्या होत्या. एक टीम पश्चिमेकडील भिंतीकडे, दुसरी घुमटाकडे, तिसरी चबुतऱ्याकडे आणि चौथी मशीद परिसरात गेली होती.
त्यामुळे मुस्लिम पक्षकार सर्वोच्च न्यायालयात आले. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी पुरातत्व विभागाला आपली भूमिका मांडण्यास सांगितलं. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने दोन दिवसासाठी सर्व्हे करण्यास बंदी घातली आहे. तसेच मशीद परिसरात खोदकाम करण्यासही मनाई केली आहे.