वर्ध्याच्या हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाचा निकाल आज येण्याची शक्यता आहे. एकतर्फी प्रेमातून पीडित प्राध्यापिकेला जाळण्याचा घटनेला ३ फेब्रुवारी रोजी दोन वर्षे पूर्ण झाली. यामुळे आज या प्रकरणाचा निकाल येण्याची दाट शक्यता आहे.
जळीतकांड प्रकरणाच्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील ऍड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली होती. आरोपी विकेश नगराळेविरोधात तब्बल ४२६ पानांचे दोषारोपपत्र हिंगणघाटच्या प्रथम श्रेणी न्यायालयात दाखल केले होते. या प्रकरणात आतापर्यंत २९ साक्षीदार तपासण्यात आले आहेत. याप्रकरणी दोन्ही बाजूचा युक्तीवाद संपला असून आज निकाल येण्याची शक्यता आहे.
जळीतकांड प्रकरणातील पीडित प्राध्यापक आशाताई कुणावार या महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र वषयाच्या अर्थवेळ प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या. ३ फेब्रुवारी २०२० रोजी त्या हिंगणघाट येथे पोहचल्या. महाविद्यालयाच्या दिशेने जात असताना आरोपी विकेश नगराळे त्यांची वाट पाहत होता. यावेळी पीडित प्राध्यापक दिसताक्षणी आरोपीने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. घटनेनंतर पीडितेला लगेचच नागपूर ऑरेंजसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आठवडाभर मृत्यूशी झुंज देत अखेर १० फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला.
या घटनेनंतर शक्ती कायदा लागू करून आरोपीला फाशी देण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. आणि राज्यात शक्ती कायदा लागू झाला. ३ फेब्रुवारीर रोजी या घटनेला दोन वर्ष पूर्ण झाले. याप्रकरणी आज संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या हिंगणघाट जळीतकांड घटनेचा निकाल येण्याची शक्यता आहे.