आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरणी सायबर पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी गोपीचंद सानपला सायबर पोलिसांनी बुलडाण्यातून अटक केली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून गोपीचंद सानप फरार झाला होता, मात्र अखेर पोलिसांनी गोपीचंद सानपला अटक केली आहे.
आरोग्य पेपरफुटी प्रकरणात जीवन सानप व गोपीचंद सानप हे दोन प्रमुख गट कार्यरत होते. आरोपी जीवन सानप याचा भाऊ संजय सानप यास तपास पथकाने अटक केल्यानंतर गोपीचंद सानप हा फरार झाला होता. अखेर पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी गोपीचंद सानपला अटक केली आहे.
राज्यातील आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पुणे पोलिसांनी ३ हजार ८१६ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहेत. २६ नोव्हेंबर २०१९ रोजी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पुण्याच्या सायबर पोलिसांच्या पथकाने राज्यात छापेमारी केली असून याप्रकरणी २० हजार आरोपींना अटक केली. याप्रकरणात मुख्य आरोपी महेश गोखले आणि प्रशांत बडगिरे हे असून त्यांनासुद्धा पोलिसांनी बेड्या घातल्या आहेत. मात्र, अद्याप अनेक आरोपी पोलिसांच्या कचाट्यातून सुटले आहेत. त्यामुळे पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून लवकरच त्यांना अटक करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दगडू हाके यांनी ‘जय महाराष्ट्र’ वृत्तवाहिनीला माहिती देताना सांगितले आहे.