महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. याचपार्श्वभूमिवर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून झिशान सिद्दीकी यांना विधानपरिषद उमेदवारी जाहीर झाली आहे. झिशान सिद्दीकी यांच्या नावावर पक्षातील जवळपास सर्वच नेत्यांकडून सकारात्मक पाठिंबा देण्यात आला होता. राष्ट्रवादी कांग्रेसचे उमेदवार झिशान सिद्धीकी निवडणूक कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी पोहोचले आहेत. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक या प्रमुख नेत्यांची उपस्थिती देखील आहे. यादरम्यान उमेदवारी जाहीर झाल्यानंतर झिशान सिद्दीकी यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली आहे.
झिशान सिद्दीकी म्हणाले की, “मी आभार मानेन सगळ्या नेत्यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचा आभारी आहे. अजित पवार यांनी शब्द दिला होता तो यांनी पाळला… अल्प संख्याक यांच्यासाठी आवाज उठवून, पूर्ण देशाच्या युवकांसाठी काम करू, लोकांसाठी काम करेन.. मी सगळ्यांचा आभारी आहे.. ही मोठी गोष्ट आहे पक्षाकडून इतके लोक असताना मला संधी दिली.. मला कायमच सुनेत्रा ताई आणि अजित पवार यांनी मुलासारख प्रेम केलं आणि आज तिकीट देताना सुद्धा मुलगा म्हणून तिकीट दिलं.. जी गोष्ट ज्या वेळेला होते त्याच वेळेला होते त्यामुळे वेळ लागला अस मी म्हणणार नाही..”
सर्वत्र विधानपरिषद निवडणुकांचे बिगुल वाजत आहे. विधान परिषदेच्या जागा साठी 12 मे रोजी मतदान होणार असून ही लढत विधान परिषदेच्या 9 जागांवर होणार आहे. याचपार्श्वभूमिवर आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. महायुतीकडून 8 तर महाविकास आघाडीकडून 1 उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. भाजप, उबाठाकडून विधान परिषदेसाठी उमेदवार जाहीर केला आहे. उबाठा गटाने काँग्रेसला विचारात न घेता उमेदवार जाहीर त्यामुळे काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार का पाहणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे महायुती निवडणूक बिनविरोध करणार की 9 वा उमेदवार देऊन लढत करणार याकडे लक्ष लागले आहे.