Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एक धक्कादायक खूनप्रकरण समोर आले आहे. प्रेमसंबंधाच्या संशयातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संवत्सर शिवारातील रामवाडी येथे ही घटना घडली.
नवनाथ माधव कानफाटे (वय अंदाजे 25 ) असे मृत तरुणाचे नाव असून,1 मार्च रोजी रात्री हनुमान मंदिरासमोर त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, आरोपींना नवनाथचे त्यांच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच कारणावरून काही दिवसांपासून वाद सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
हेही वाचा:Pune : अचानक मोठा आवाज आला अन् रक्ताच्या थारोळ्यात दिसली तरुणी; पुण्यात धक्कादायक प्रकार
घटनेपूर्वी नवनाथच्या भावाला धमकी देण्यात आली होती. “तुझ्या भावाला समजावून सांग, नाहीतर त्याचा काटा काढू,” असा इशारा आरोपींकडून देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. रविवारी रात्री सुमारे सव्वानऊच्या सुमारास आरोपींनी नवनाथला फोन करून बाहेर बोलावले. त्यानंतर “तू आमच्या बहिणीच्या गावात का जातोस?” या कारणावरून त्याच्याशी वाद घातला. वादाचे रूपांतर काही क्षणांतच हिंसाचारात झाले.
पूर्वनियोजित कटानुसार आरोपींनी लोखंडी कत्ती, विटा आणि दगडांच्या साहाय्याने नवनाथवर हल्ला चढवला. गंभीर मारहाण झाल्याने तो घटनास्थळीच कोसळला. स्थानिकांनी मदतीचा प्रयत्न केला; मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव सिटी पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. फिर्यादी समाधान कानफाटे यांच्या तक्रारीवरून चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत काही तासांतच संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.