मुंबई, १० मे २०२३, प्रतिनिधी : अभिनेते योगेश सोमण यांनी मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. ते समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असतात. अशातच त्यांचा एका व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ते ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओत योगेश सोमण यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावर भाष्य केले आहे. ते म्हणाले,”नमस्कार, दोन दिवसांपूर्वी ‘द केरळ स्टोरी’ या नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. इंटरनेटवर किंवा इतर माध्यमांवर या चित्रपटावरुन गदारोळ उठला. काहीजणांनी त्याचं गांभीर्य लोकांना सांगितलं… काही लोकांनी त्याची सत्य – असत्यता याबाबत आपले विचार मांडले पण अचानक माझ्या हाती रामदास स्वामी यांच्या अस्मानी-सुलतानीच्या चार ओळी आल्या. मी तर असं म्हणतो की, द केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी रामदास स्वामी यांनी लिहून ठेवलेली आहे.
“किती गुज्रिणी ब्राह्मणी भ्रष्टविल्या।
किती शांमुखी जाहाजी फाकवील्या।
कितीयेक देशांतरी त्या विकील्या।
किती सुंदरा हाल होवोनि मेल्या।”
अशा त्या चार ओळी आहेत. यावरूनच माळ असे वाटते की ,समर्थ रामदास स्वामी यांनी केरळ स्टोरीची वनलाईन शेकडो वर्षांपूर्वी लिहून ठेवली आहे.
या चार ओळींसह योगेश सोमण यांनी ओळींचा अर्थ देखील सांगितला.त्यानंतर त्यांनी शांमुखी आणि फाकवील्या या शब्दाबाबत देखील सांगितलं. ते म्हणाले, शांमुखी हा शब्द शहामुखी नावाच्या शब्दाचा अपभ्रंश आहे. तर फाकवील्या म्हणजे पाठवल्या. हा व्हिडिओ पाहून सध्या समाज माध्यमांवर आणखी चर्चा रंगू लागल्या आहेत.