जालना: 'सरकारी काम अन् सहा महिने थांब' ही म्हण आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. पण जेव्हा या प्रशासकीय दिरंगाईची आणि असंवेदनशीलतेची किंमत एखाद्या निष्पाप माणसाला स्वतःचा जीव देऊन चुकवावी लागते, तेव्हा या व्यवस्थेचा राग येणं हे स्वाभाविक आहे. जिंतूर तालुक्यातील येलदरी येथे घडलेली भयंकर दुर्घटना ही याच नियोजनशून्यतेचा ज्वलंत पुरावा आहे. पूर्णा नदीवरील जुन्या, मोडकळीस आलेल्या आणि कठडे नसलेल्या पुलावरून एक पिकअप गाडी थेट खोल पात्रात कोसळली. या भीषण अपघातात एका 31 वर्षीय उमद्या तरुणाला त्याचा जीव नाहक गमवावा लागला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या अक्षम्य हलगर्जीपणाबद्दल संपूर्ण पंचक्रोशीत संतापाची लाट उसळली आहे.
या हृदयद्रावक घटनेतील मृत तरुणाचे नाव अंकुश रामेश्वर शिंदे (रा. शिंदे टाकळी, ता. सेनगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश हे मंगळवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास त्यांची पिकअप गाडी घेऊन जालन्याहून गावाकडे परतत होते. येलदरी येथील पूर्णा नदीवरील जुना पूल अत्यंत अरुंद आहे.
त्यातच रात्रीची वेळ आणि पुलाला कसलेही संरक्षक कठडे नसल्याने अंकुश यांचा गाडीवरील ताबा सुटला. क्षणातच काळानं घाला घातला आणि गाडी थेट नदीच्या खोल पात्रात कोसळली. सध्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने प्रवाहाचा वेग प्रचंड होता, परिणामी अंकुश यांना गाडीबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
या घटनेतील सर्वात मोठा आणि प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा पुरावा देणारा विरोधाभास म्हणजे, याच जुन्या पुलाशेजारी कोट्यवधी रुपये खर्चून आधुनिक 'जर्मन टेक्नॉलॉजी'वर आधारित (केबल स्टे) नवा कोरा पूल उभारण्यात आला आहे. मात्र, हा पूल केवळ प्रशासनासाठी 'बोजा' ठरला आहे.
हा नवा पूल वर्षभरापासून तयार असूनही, केवळ दोन्ही बाजूंचे पोहोच रस्ते अपूर्ण असल्यामुळे तो रहदारीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. परिणामी, मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरील प्रवाशांना रोज स्वतःचा जीव मुठीत धरून त्या जुन्या, मृत्यूच्या सापळ्यासारख्या पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे.
जुन्या पुलाची अवस्था इतकी दयनीय आहे की, गेल्या वर्षी आलेल्या पुरात या पुलाचे उरलेसुरले कठडेही वाहून गेले होते. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाने तिथे साधे तात्पुरते संरक्षक लोखंडी कठडे बसवण्याची तसदी घेतली नाही. बुधवारी सकाळी पुलावरून जाणाऱ्या काही नागरिकांना नदीपात्रात गाडी दिसल्यानंतर हा भयंकर अपघात उघडकीस आला. योगायोगाने बुधवारी येलदरीचा आठवडी बाजार असल्याने पुलावर मोठी गर्दी होती. अपघातग्रस्त वाहन आणि मृतदेह बाहेर काढण्याच्या या बचाव कार्यात पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि तब्बल चार तास वाहतूक कोंडी झाली होती. अखेर जिंतूर पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून मृतदेह पाण्याबाहेर काढला.
या दुर्घटनेमुळे येलदरी आणि शिंदे टाकळी परिसरातील ग्रामस्थांच्या संयमाचा बांध आता फुटला आहे. नवा पूल तयार असूनही तो सुरू करण्यासाठी आणखी किती निष्पाप बळींची प्रशासनाला प्रतीक्षा आहे? असा जळजळीत सवाल आता संतप्त नागरिक विचारत आहेत. या 'मृत्यूपुलाच्या' विळख्यातून वाहनधारकांची सुटका करण्यासाठी नव्याने उभारलेला 'केबल स्टे' पूल आणि जिंतूर-येलदरी रस्त्याचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून तो तत्काळ खुला करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासनाने आता तरी डोळ्यांवरची पट्टी काढावी, अन्यथा हा जनक्षोभ अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.