मुंबई: महिला प्रीमियर लीग (WPL) 2026 चा पहिलाच सामना थरार, उत्कंठा आणि शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या नाट्याने भरलेला ठरला. या सामन्यात Royal Challengers Bengaluru ने गतविजेत्या Mumbai Indians संघावर अखेरच्या चेंडूवर तीन विकेट्सने विजय मिळवत आपल्या मोसमाची दणदणीत सुरुवात केली. या विजयाची नायिका ठरली ऑलराऊंडर नॅडीन डी क्लर्क, जिने एकहाती सामन्याचा रंग बदलला.
नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानुसार नॅडीन डी क्लर्कने सुरुवातीलाच प्रभाव टाकत मुंबईच्या फलंदाजीला हादरा दिला. मुंबईची अवस्था 67 धावांत 4 विकेट्स अशी झाली होती. मात्र, निकोल कॅरी आणि संजीवन सजना या दोघींनी पाचव्या विकेटसाठी 82 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करत डाव सावरला. आरसीबीच्या काही ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा त्यांना फायदा झाला.
मात्र अखेरच्या षटकात पुन्हा एकदा नॅडीन डी क्लर्क चमकली. तिने शेवटच्या षटकात दोन्ही सेट फलंदाजांना बाद करत मुंबईचा डाव 154/6 धावांवर रोखला. डी क्लर्कने 4 विकेट्स घेत केवळ 26 धावा दिल्या आणि सामन्यावर आपली छाप सोडली.
155 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात स्फोटक झाली.स्मृति मंधाना आणि लॉरा हॅरिस या दोघींनी अवघ्या तीन षटकांत 40 धावा फटकावत सामन्यावर पकड मिळवली. मात्र त्यानंतर मुंबईच्या गोलंदाजांनी जोरदार पुनरागमन केले. अमेलिया केर आणि शबनिम इस्माईल यांनी मधल्या फळीत धुमाकूळ घालत आरसीबीला 65/5 अशी अडचणीत टाकले.
16व्या षटकानंतर आरसीबीला शेवटच्या 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज होती, तर अखेरच्या षटकात समीकरण 18 धावांवर आले. सामना मुंबईच्या हातातून जाणार नाही, असे चित्र दिसत होते. पण नॅडीन डी क्लर्कने संयम राखत, स्ट्राइक फिरवत आणि मिळेल त्या संधीचा फायदा घेत सामना पुन्हा आरसीबीच्या बाजूने वळवला.
डी क्लर्कने नाबाद 63 धावा करत (44 चेंडू, 7 चौकार, 2 षटकार) शेवटच्या चेंडूवर विजयी धाव घेतली आणि आरसीबीला 157/7 अशी मजल मारून दिली. तिच्या या अफलातून कामगिरीमुळे WPL 2026 च्या पहिल्याच सामन्यात क्रिकेटप्रेमींना संस्मरणीय थरार पाहायला मिळाला.