महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामना आज 8 मार्चला खेळण्यात येणार आहे. टीम इंडिया विरुद्ध गतविजेत्या ऑस्ट्रेलिया यांच्यात हा अंतिम सामना रंगणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम सामन्याला दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे.
टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात सेमी फायनल सामना पावसामुळे रद्द करावा लागला. टीम इंडियाची पॉइंट्स टेबलमधील कामगिरी चांगली असल्याने टीम इंडियाला थेट अंतिम फेरीचं तिकीट देण्यात आलं.
तर दुसऱ्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाने सेमी फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत धडक मारली.
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात साखळी फेरीत सामना खेळण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला होता.
या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे आपली विजयी घौडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी मात्र साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न ऑस्ट्रेलियाचा असणार आहे.
महिला टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडकण्याची टीम इंडियाची ही पहिलीच वेळ आहे.
तर ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 4 वेळा टी-20 वर्ल्ड कप जिंकण्याची किमया केली आहे.
तसेच ऑस्ट्रेलिया हा गतविजेता संघ आहे.
लेडी सेहवाग म्हणजेच शेफाली वर्मा सातत्याने धडाकेबाज खेळी करत आहे. शेफालीने साखळी सामन्यातील एकूण 4 सामन्यात 161 धावा केल्या आहेत.
तसेच या स्पर्धेत सर्वाधिक सिक्स हे शेफालीनेच लगावले आहेत.
त्यामुळे शेफालीकडून टीम इंडियाला आजच्या अंतिम सामन्यात धमाकेदार खेळीची अपेक्षा असणार आहे.
टीम ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी, एलिसा हीली (विकेटकीपर), मेग लॅनिंग (कॅप्टन), सोफी मोलिनेक्स, एश्ले गार्डनर, रचेल हेन्स, निकोला कॅरी, अनाबेल सदरलँड, जेस जोनासन, मेगन शट आणि तायला लॅमिंक
टीम इंडिया : शैफाली वर्मा, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिगज, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), दीप्ति शर्मा, वेदा कृष्णामूर्ती, शिखा पांडे, तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, राधा पांडे आणि राजेश्वरी गायकवाड