शरद पवार यांच्या नेतृत्वात आज मुंबईतील YB चव्हाण सेंटर येथे आयोजित करण्यात आलेली बैठक पार पडली असून बैठकीत अनेक विषयांवर सविस्तर चर्चा झाली. अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण होणार अशी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या या बैठकीत दोन्ही पक्षाच्या विलिनीकरण मुद्यावर चर्चा झाली. यावेळी या बैठकीला सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील देखील उपस्थित होते. पक्षाने विलिनीकरणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती शरद पवार यांच्या उपस्थितीत पदाधिकारी यांनी केली. यावेळी विलिनीकरणाबाबत शरद पवार साहेब जो निर्णय घेतील तो मान्य असेल पण निर्णयावर स्पष्टता द्यावी अशी विनंती पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना केली.
त्यानुसार शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वात आज झालेल्या बैठकीत दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत वरिष्ठांनी आपली भूमिका मांडली. यावर बोलताना पक्षाचे वरिष्ठ नेते जयंत पाटील आणि सुप्रिया सुळे यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर पडदा पडला आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण होणार नाही असं बैठकीत स्पष्ट झाले आहेत. यावेळी जेव्हा नेते भूमिका मांडत होते तेव्हा शरद पवार यांनी मौन बाळगले होते. मात्र अजित पवार यांच्या निधनानंतर स्वत: शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार होतं, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार यांनी यावेळी देखील भूमिका स्पष्ट करायला हवी होती अशी अपेक्षा उपस्थित नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची होती.
शरद पवार यांच्या बैठकीला अनेक आमदार खासदार गैरहजर
दरम्यान वाय बी चव्हाण सेंटर येथे शरद पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला अनेक आमदार खासदार गैरहजर असल्याचे देखील पाहायला मिळाले. यात अमोल कोल्हे, अमर काळे, रोहित पवार, रोहित पाटील, नारायण पाटील, राजू खरे हे खासदार आणि आमदार गैरहजर होते. तसेच शरद पवार स्वतः बैठक बोलवली मात्र तरी ही अनेक आमदार खासदर गैरहजर राहिल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
हेही वाचा- Medical Stores Closed: औषध विक्रेत्यांचा आज देशव्यापी संप! मुंबई, पुण्यासह राज्यातील लाखो मेडिकल बंद, अत्यावश्यक औषधांसाठी काय आहेत पर्याय?
शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीतील चर्चेचे महत्त्वाचे मुद्दे-
विलीनीकरणाबाबत चर्चा झाली मात्र तुतारी या चिन्हावरच पक्षाची या पुढची वाटचाल असावी नेत्यांचा शरद पवार यांच्या समोर सूर
सध्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा होणार नाही आपल्याला आपलाच पक्ष मोठा करायचा आहे खासदार सुप्रिया सुळे यांचे सर्व नेत्यांसमोर मत
दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधील कुठल्याही नेत्याबाबत बैठकीत चर्चा नाही
देशातील इंधन संकट महागाई याबाबत बैठकीत चर्चा
नीट परीक्षेतील पेपर फुटी बाबतही राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चर्चा
नीट परीक्षेतील घोळाबाबत राष्ट्रवादी युवक आणि युवती काँग्रेस तरुणांशी संवाद साधणार