करतारपूर कॉरिडॉरच्या उद्घाटनावेळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांना मिठी मारून विरोधकांच्या निशाण्यावर आलेल्या नवज्योत सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना मोठे भाऊ म्हणून संबोधले आहे. त्यांच्या या व्हिडिओमुळे नवज्योत सिंग सिद्धू वादाच्या भोवऱ्यात सापडले असून भाजपने सिद्धू यांना घेरले आहे. नवज्योत सिंग सिद्धूंच्या या वक्तव्यामुळे भाजप आमदार राम कदम यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
भाजप आमदार राम कदम यांनी पत्रातून सवाल उपस्थित केला आहे. नवज्योत सिंग सिद्धूच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी गप्प का? असा सवाल राम कदम यांनी उपस्थित केला आहे.
करतारपूर येथे पाकिस्तानी शिष्टमंडळाने नवज्योत सिद्धू यांचे स्वागत केले. यावेळी सिद्धू म्हणाले, ‘इमरान खान माझा मोठा भाऊ आहे. त्याने मला खूप प्रेम दिले आहे.’ सिद्धू यांच्या या वक्तव्यामुळे आता ते वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.
भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी सिद्धूंवर निशाणा साधला आहे. संबित पात्रा म्हणाले, ‘आज सिद्धूंनी इमारान खान यांना मोठा भाऊ म्हणत त्यांच्यावर खूप प्रेम करतो असे म्हणाले. सिद्धूंच्या या वक्तव्यामुळे भारतीयांसाठी ही चिंतेची बाब आहे. सलमान खरशीद, मणिशंकर अय्यर, रशीद अल्वी आणि राहुल गांधी हे हिंदू आणि हिंदुत्वाला शिव्या देतात. तसेच दुसरीकडे सिद्धू पाकिस्तानच्या हिताची विधाने करत आहेत. हा योगायोग नाही.’ असे संबित पात्रा म्हणाले.