मुंबई, २४ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : चांद्रयान – ३ मधील विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. लँडरमधून बाहेर आलेले प्रज्ञान रोव्हर चंद्रावर संशोधन करणार आहे. रोव्हरच्या मदतीने इसरो चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संशोधन करणार आहे. ध्रुवीय प्रदेशातील माती कोट्यवधी वर्षांपासून सूर्यप्रकाशापासून दूर आहे. यामुळे या मातीच्या नमुन्यांवर संशोधन करून चंद्राशी संबंधित अनेक गुपिते शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ज्या भागात संशोधन केले जाणार आहे त्या भागातील माती दोन अब्ज वर्ष अंधारात आणि थंड वातावरण आहे. या मातीमध्ये बर्फाचे रेणू सापडतात का, याचा शोध घेतला जाईल. याआधी चांद्रयान – १ च्या मोहिमेतच चंद्राच्या ध्रुवीय प्रदेशात पाण्याचे अस्तित्व असल्याचे सिद्ध झाले आहे.