देशात सध्या भाजपाविरोधी वातावरण आहे. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे चिंताजनक चित्र आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये ख्रिश्चन समाजाच्या प्रार्थनास्थळांवर हल्ले होत आहेत. ख्रिश्चन समाज अतिशय शांत आहे. एखाद्या व्यक्तीने कुठेतरी आपला वैयक्तिक धर्म बदलण्याचा निर्णय घेतला तर संपूर्ण समाज आणि धार्मिक स्थळांवर हल्ला केला जातो, असे मोठे विधान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत केले होते. त्यावर निवडणुका जवळ आल्या की शरद पवार काय बोलतात. मागच्या निवडणुकांपूर्वीही पवारांचे हेच ते डायलॉग्ज होते. त्यांचे डायलॉग्ज आम्हाला पाठ झाले आहेत. निवडणुका जवळ येताच शरद पवारांना काही समाजाबद्दल पुळका येतोच, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.
देशातल्या अनेक राज्यांमध्ये भाजपाची सत्ता नाही. महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यांमध्ये तोडफोड करुन सत्ता मिळवली गेली आहे. सध्याचा जो ट्रेंड आहे तो भाजपा विरोधी आहे. त्यामुळे असाच ट्रेंड कायम राहिला तर २०२४ मध्ये देशाचे चित्र बदलेलं दिसेल,असेही शरद पवार म्हणाले होते. याचविषयी देवेंद्र फडणवीस म्हणाले. ट्रेंड बदलण्याची स्वप्न पवारसाहेब वर्षानुवर्षे पाहात आहेत. २०१४, २०१९ लाही त्यांनी लोकसभा निवडणुकीत ही स्वप्न बघितले होते. विधानसभेतही पाहिली. पण ती काही पूर्ण झाली नाहीत.
तसेच मी तुम्हाला सांगतो हे जे डायलॉग तुम्ही पवारसाहेबांचे सांगत आहात असेच २०१४ मध्ये होते, २०१९ मध्ये होते. निवडणुका आल्या की शरद पवारांचे डायलॉग काय असतील याची आम्हाला सवय झाली आहे. देशभरात मोदी विरोधी वातावरण आहे म्हणत आहेत कुठे आहे मोदीविरोधी वातावरण? ३०० पेक्षा जास्त लोक निवडणून आले तरीही मोदीविरोधी वातावरण दिसतं आहे. निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे बोलत आहेत.