कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. एकीकडे भाजपने विजयाचा गुलाल उधळला असतानाच दुसरीकडे ममता बॅनर्जी यांची 15 वर्षांची सत्ता लयाला गेल्याचे चित्र आहे. बंगालमध्ये 294 विधानसभा जागांपैकी भाजपने 195 जागांवर आघाडी घेतली असून ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष मोठ्या पराभवाच्या दिशेने जाताना दिसत आहे. परंतू काही जागांवर भाजप आणि टीएमसी यांच्यात अजूनही काटें की टक्कर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या मतदारसंघातील आकडे इतकी चुरशीची लढत दाखवते की, एकतर्फी निकाल लागणे अशक्य आहे. त्यामुळे येथील निकाल कधीही पलटू शकतो.
निवडणूक आयोगाने दुपारी साडेतीन वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार टीएमसी आघाडीवर असलेल्या सुमारे 11 जागांवर कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकते. असे झाल्यास भाजपचा आकडा 200 ओलांडून 206 पर्यंत जाऊ शकतो. तसेच टीएमसी आणि भाजपमध्ये एका जागेवर केवळ 137 मतांचे अंतर आहे. या जागेवर दुपारी 15 पैकी फक्त 5 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली होती. म्हणजेच उर्वरित 10 फेऱ्यांत निकाल कधीही बदलू शकतो.
साधारण 11 विधानसभा जागांवर टीएमसी खूपच कमी फरकाने आघाडीवर असून या जागांमध्ये मंगळकोट, श्रीरामपूर, हरिपाल, मगराहाट पूर्व, लाभपूर, औसग्राम, कुशमंडी, हावडा मध्य, बाली, कांडी, कुलपी आणि पलाशीपारा या मतदारसंघांचा समावेश आहे. तसेच संदेशखाली, सोनारपूर उत्तर, उदयनारायणपूर, श्यामपूर, टॉलीगंज, सैंथिया, जगतदल आणि जगतबल्लवपूर या जागांवर भाजपला काटें की टक्कर मिळत आहे.