West Bengal CM : पश्चिम बंगालमध्ये भाजपला अभूतपूर्व यश मिळालं, राज्यात पहिल्यांदाच कमळ फुललं. 294 पैकी तब्बल 206 जागा जिंकत भाजपने तृणमूल काँग्रेसला पराभवाची धूळ चारली. पण प्रचंड विजयानंतर पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? याबाबत चर्चा रंगल्या आहेत. भाजप बंगालची सूत्रं कोणाच्या हाती सोपवणार? कोणाच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. भाजप निवडणुकीआधी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करत नाही, हे दिसून आलं आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अग्रस्थानी होते, त्यांनी तब्बल 20 हून अधिक प्रचारसभा घेतल्या. पंतप्रधान मोदी बंगालच्या संस्कृतीशी एकरुप झाले. बंगालची प्रसिद्ध झालमुरी खावून जनतेला आपलंस केलं आणि त्यामुळेच पश्चिम बंगालमध्ये भाजपला बहुमत मिळालं.
पश्चिम बंगालमध्ये भाजप अजून मजबूत करण्यासाठी एक कणखर मुख्यमंत्री निवडायचा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सांगितलं होतं की ‘पश्चिम बंगालमध्ये भाजप सत्तेत आली तर मुख्यमंत्री हा ‘बंगाली’चं होईल. त्यामुळे निकालानंतर अनेकांच्या नावांची आता चर्चा होतेय. भाजपने निवडणूक प्रचारात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले होते. त्यामुळे, पक्ष एखाद्या महिलेला मुख्यमंत्री म्हणून निवडून देईल, चर्चा रंगली आहे. सध्या दिल्ली वगळता भाजपच्या कोणत्याही राज्यात महिला मुख्यमंत्री नाही.
सुवेंदू अधिकारी
एकेकाळी ममता बॅनर्जी यांचे निकटचे सहकारी आणि तळागाळात मोठा प्रभाव आणि एक मजबूत संघटन असलेले सुवेंदू अधिकारी मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहेत. 2021 मध्ये, नंदिग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा पराभव करून ते ‘जायंट किलर’ ठरले होते. पण, नारदा स्टिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्यामुळे मुख्यमंत्री बनण्याच्या त्यांच्या मार्गात अडथळा निर्माण होऊ शकतो.
दिलीप घोष
पश्चिम बंगाल भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष हे सुद्धा प्रबळ दावेदार आहेत. 2021 मध्ये भाजपला प्रमुख विरोधी पक्ष बनवण्याचे श्रेय दिलीप घोष यांना दिले जाते. प्रदेशाध्यक्ष नसले तरी बंगालच्या राजकारणात त्यांचा प्रभाव कायम आहे.
समीक भट्टाचार्य
पश्चिम बंगाल भाजपचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांचंही नाव मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत आहे. पक्ष संघटना वाढीसाठी समीक भट्टाचार्य यांनी मोठी भूमिका बजावली आहे. त्यामुळे, भाजप त्यांना बंगालचा मुख्यमंत्री करण्याचा विचार करु शकतं.
अग्निमित्रा पॉल
पेशाने फॅशन डिझायनर असलेल्या अग्निमित्रा पॉल या भाजपच्या स्पष्टवक्त्या नेत्यांपैकी एक आहेत. आता झालेल्या निवडणुकीत त्यांनी आसनसोल दक्षिण ही जागा कायम राखली आहे. जर भाजपने राज्यात महिला मुख्यमंत्री निवडली, तर अग्निमित्रा पॉल यांचं नाव चर्चेत असेल.
रूपा गांगुली
सोनारपूर दक्षिणच्या माजी राज्यसभा खासदार आणि आमदार रूपा गांगुली यांचंही नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहे. महिला मोर्चाच्या अध्यक्षा म्हणून तळागाळाच्या स्तरावरही काम केले आहे. जी बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’मधील द्रौपदीच्या भूमिकेमुळे त्या घराघरात पोहोचल्या आहेत. रूपा गांगुली यांची लोकप्रियता पाहता, भाजप त्यांना बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी विचार करु शकतं. त्यामुळे भाजप महिला मुख्यमंत्रिपदावर विश्वास ठेवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.