आज मुंबईसह कोकणात नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. त्याचसोबत मराठवाडा येथे गारपिटीची तर मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तसेच विदर्भातही शुक्रवारपासून उष्णतेची तीव्रता कमी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तावली आहे. आज मुंबईसह पालघरमध्ये तापमानात घट होण्याची शक्यता असून कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे येथे हलक्या सरींची शक्यता आहे. यावेळी 2-3 अंशाने तापमानात घट होण्याची शक्यता असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात नाशिकसह धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर येथे तापमान जरी 40 अंश सेल्सिअसच्या पार गेलं असलं तरी वादळी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात नांदेडसह धाराशिव आणि लातूर वादळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम असून कमाल तापमान चाळीशीपार नोंदवले जात आहे, तरी काही भागांत मेघगर्जनेसह मान्सूनपूर्व पावसाची शक्यता आहे.
विदर्भात उन्हाची दाहकता कायम असून वर्धेत 46.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नागपूरमध्येही पारा 46.4 अंशांवर पोहोचला आहे. गोंदिया, चंद्रपूर, अमरावती, अकोला, ब्रम्हपुरी आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्येही तापमान 45 अंशांच्या पुढे गेल्यानं नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. तर भंडारा आणमि यवतमाळ येथे तापमान 44 अंशांच्या पुढे गेलं आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस उष्णतेची लाट हळूहळू कमी होत, तापमान घटणार असा अंदाज व्यक्त केला आहे
दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात आज सकाळच्या वेळी अवकाळी पावसाची रिपरिप पाहायला मिळाली. अचानक झालेल्या या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. काल गोंदिया जिल्ह्याचे तापमान तब्बल 46.1 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. दरम्यान, रब्बी धान कापणीला सुरुवात झाल्याने जोरदार पाऊस झाल्यास कापलेले धान भिजण्याची शक्यता असून शेतकरी चिंतेत आहेत.