जून महिन्याचे 15 दिवस कोरडे गेल्यानंतर मुंबईत मान्सूनचा जोर वाढला आहे. पुढील दोन दिवस शहर भागात सर्वाधिक पावसाचा अंदाज वर्तावला आहे. हवामान विभागाचा 24 जून रोजी मुंबई आणि परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला होता. त्यानुसार हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला आहे. नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेऊनच घराबाहेर पडावे तसेच समुद्रकिनाऱ्यालगत जाणे टाळावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून रखडलेला नैऋत्य मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. पुणे, धाराशिव, सोलापूर तसेच कोकणातील अलिबाग परिसरात मान्सून दाखल झाला आहे. पुढील 3 दिवस राज्यातील अनेक भागांत चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
कोकणात काय स्थिती?
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात काल पासून जिल्ह्यात सर्वत्र तालुक्यात पावसाची बॅटिंग पाहायला मिळाली होती. तर रात्री आंबोलीसह दोडामार्ग तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर आज सकाळपासून पावसाची रिपरिप कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. तर सह्याद्री पट्ट्यात तसेच पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये दमदार पाऊस सुरू आहे.
रायगड जिल्ह्याला रात्री मुसळधार पावसाने चांगलाच झोडपून काढले त्यामुळे अनेक सकळ भागात पाणी साचले. आज देखील रायगड मध्ये विविध भागात जोरदार पावसाने हजेरी लावत आपली बॅटिंग सुरू केलीय. त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आले आहे. अनेक कोरड्या पडलेल्या नद्या देखील काही प्रमाणात वाहू लागल्या आहेत. रायगड मधील मुरुड, अलिबाग पेण तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून अनेक सकळ भागात पाणी साचले आहे. त्यामुळे पावसाचा जोर कायम राहिल्यास रायगड जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात वारे बदलले
सातारा जिल्ह्यात कालपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाटण तालुक्यातील पाथरपुंज येथे कालच्या दिवसभरात सर्वात जास्त पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. पाथरपुंज येथे काल दिवसभरात 174 मिलिमीटर पाऊस झाला असून कोयना धरण परिसरात 95 मिलिमीटर नवजाला 112 मिलिमीटर आणि महाबळेश्वर येथे 142 मिलिमीटर पाऊस नोंद झाला आहे. या पावसामुळे राज्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेला ओझर्डे धबधबा प्रवाहित झाला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात कालपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. काल रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरवासीयांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असला, तरी दुसरीकडे मात्र काही भागांत नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. आज दिवसभर देखील पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी रस्त्यावरून जाताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.
मागील दोन दिवसांपासून जोरदार स्वरूपात मान्सून कोसळल्यानंतर आज पुन्हा रिमझिम पावसाच्या सरी नाशिक शहर व परिसरात कोसळू लागल्या आहेत. सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या महिन्याभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पेरणीपूर्व मशागत व खरिपाच्या पेरणीची लगबग आता सुरू होणारा आहे.
अखेर विदर्भ-मराठवाड्यात पावसाचं आगमन
महीनाभराच्या विश्रांतीनंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रिमझिम पावसाची हजेरी लागली आहे. महीनाभराच्या विश्रांतीनंतर अखेर वरुणराजाने छत्रपती संभाजीनगर शहरासह पैठण, वैजापूर ,सिल्लोड या तालुक्यातील विविध भागात रिमझिम सरी बरसवल्या. गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र पडलेल्या हलक्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी हवामान विभागाकडून 3 दिवस यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर छत्रपती संभाजीनगर व परिसरात येत्या 26 जूनपर्यंत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडेल, असा अंदाज आहे.
वर्धा जिल्ह्यात अखेर वरुणराजाने दमदार हजेरी लावत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहेय. आद्रा नक्षत्रातील पावसाच्या सरींमुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग आला असून ग्रामीण भागात शेतकरी मोठ्या उत्साहात शेतात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाअभावी शेतकरी दुहेरी संकटात सापडला होता. एकीकडे पेरण्या खोळंबल्या होत्या, तर दुसरीकडे भूगर्भातील पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने आणि जलाशयांतील पाणीसाठ्यात मोठी घट झाल्याने भविष्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही ऐरणीवर आला होता. मात्र, रात्रीभर झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीला आवश्यक ओलावा मिळाला आहे. त्यामुळे शेतकरी आता पेरणीच्या कामात व्यस्त झाला असून खरीप हंगामाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र आहे. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
गोंदिया जिल्ह्यात काल रात्रीच्या सुमारास दमदार पाऊस झाला असून या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणीसाठी आधार झाला आहे. तर जिल्ह्यात मुसळधार पावसाची अजूनही प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे, तर आलेल्या पावसामुळे होत असलेल्या उखड्या पासून नागरिकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात अखेर काल संध्याकाळी मान्सून दाखल झाले असून उकड्यापासून हैराण असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. तर खरिपाच्या पूर्वमशागतीला वेग येणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धान नर्सरी साठी पावसाची प्रतीक्षा होती ती या दमदार पावसाने पूर्ण झाली असून धान नर्सरीला नवसंजीवनी मिळाली आहे.