राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण चांगलच तापलं आहे. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात जागा सहा आणि उमेदवार सात आहेत. दरम्यान, राज्यसभा निवडणुकीसाठी राज्यातील अपक्ष पक्षाला अधिक महत्त्व आले आहे. बहुजन विकास आघाडी आणि समाजवादी पार्टी मविआवर नाराज असल्याची चर्चा जोर धरत आहे. अशातच, एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी राज्यसभेच्या निवडणुकीबाबत अद्याप मविआकडून आमच्याशी संपर्क झाला नसल्याचे नांदेडमध्ये आयोजित सभेत सांगितले.
राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भात आमच्याशी महाविकास आघाडीच्या वतीनं कुणी बोललं नाही तसेच आमच्या आमदारांसोबत कुणी बोलल नाही. महाविकास आघाडीला आमची गरज असल्यास त्यांनी एमआयएमशी संपर्क करावा. राज्यसभेच्या निवडणुकीबाबत आम्ही दोन दिवसात आमचा निर्णय घेणार असल्याचं एमआयएमचे अध्यक्ष खासदार अससुद्दीनओवेसी यांनी नांदेडमध्ये सांगितलं.
एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी मविआबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकार निधी वाटपात पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. तसेच राज्यसभेत कोणत्या पक्षाला पाठिंबा करणार याबाबत पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी निर्णय घेणार असल्याचे जलील म्हणाले. त्यामुळे आता असदुद्दीन ओवैसी राज्यसभेच्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
येत्या १० जून रोजी राज्यसभा निवडणूक पार पडणार आहे. मात्र, अपक्ष आमदारांनी अद्याप राज्यसभा निवडणुकींबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. तर अपक्ष आमदारांनी नाराजी व्यक्त केली असल्यामुळे आता मविआत तणाव निर्माण झाला असून राज्यसभा निवडणुकीत मविआला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.