लाडक्या विठूरायाचा लाडू प्रसाद आता महागला आहे. १५ रूपयांना मिळणारा लाडू प्रसाद आता २० रूपयांना मिळणार आहे. वाढत्या महागाईचा असाही फटका विठू भक्तांना बसला आहे. विठ्ठल – रुक्मिणी दर्शनासाठी दररोज हजारो भाविक पंढरपुरात येतात. येणारे भाविक विठूरायाचा प्रसाद म्हणून बुंदी लाडू खरेदी करतात. मंदिर समितीच्या वतीने भाविकांना लाडू प्रसादाची विक्री केली जाते. कोरोनामुळे सध्या लाडू प्रसादाची विक्री बंदी आहे. दरम्यान, आषाढी यात्रेच्या मुहूर्तावर पुन्हा लाडू प्रसाद विक्री करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. त्याबरोबरच मंदिर समितीने साखर, तेल, डाळीसह मजुरी दरात वाढ झाल्याने लाडू प्रसाद विक्रीत ३५ ते ४० टक्के इतकी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे भाविकांना १४० ग्रॅम वजनाच्या दोन लाडूसाठी २० रूपये मोजावे लागणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाला होता. आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतो असं वारकरी सांगतात. वर्षभरात साधारण ५० ते ५५ लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयांचं उत्पन्न मिळत होतं. कोरोना काळात दोन हा लाडू प्रसाद समितीने बंद केला होता. मंदिर सुरु होऊनही लाडू प्रसाद मिळत नसल्याने भाविकांच्या नाराजी होती. आता आषाढीपूर्वी लाडू देण्याची तयारी असून लाडू प्रसाद मात्र २० रुपये होणार असल्याचं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलं आहे.