ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं आहे. काल 11 एप्रिल रोजी आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान आज त्यांचे दु:खद निधन झाले त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी ही दुर्दैवी बातमी दिली. दरम्यान उद्या सकाळी 11.00 ते 3.00 दरम्यान अंतिम दर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी त्यांचे पार्थिव ठेवलं जाईल. तर उद्या सायंकाळी 4.00 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार होणार आहेत. दादर शिवाजी पार्क स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आशा भोसले यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. याचपार्श्वभूमिवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
संगीतविश्वातील सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची श्रद्धांजली
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून, सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आशा भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती. हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमधील हजारो गाण्यांमधून त्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’, ‘इन आंखों की मस्ती’, ‘चुरा लिया है तुमने’ यांसारखी असंख्य गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गायकीत आधुनिकतेसोबतच पारंपरिकतेचा सुंदर संगम दिसून येतो.
आशा भोसले यांचा संगीत प्रवास म्हणजे कठोर परिश्रम, सातत्य आणि कलेप्रति असलेल्या निष्ठेचे प्रतीक आहे. त्यांनी अनेक पिढ्यांतील श्रोत्यांना आपल्या सुरांनी मंत्रमुग्ध केले. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीतसृष्टीचे मोठे नुकसान झाले आहे. आपल्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीत आशा भोसले यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. आपल्या कर्तृत्वाने संगीत क्षेत्रात त्यांनी मानाचे स्थान निर्माण केले. त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे त्यांना जागतिक स्तरावरही विशेष ओळख मिळाली होती.
आशा भोसले यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला असून सुरांची ‘सम्राज्ञी’ काळाच्या पडद्याआड गेली आहे. मी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. आशाताई भोसले यांच्या आवाजात विलक्षण माधुर्य, विविधता आणि भावनांची अप्रतिम अभिव्यक्ती होती.… pic.twitter.com/oA9TxrIM6t — Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) April 12, 2026