पुणे: पुण्यातील वैष्णवी हगवणे यांनी सासरच्या लोकांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे, संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. अशातच, हगवणे कुटुंबातील दुसरी सून मयुरी हगवणे यांनी देखील समोर येऊन हगवणे कुटुंबीयांवर गंभीर आरोप केले आहेत. सोबतच, मयुरीच्या माहेरच्यांनी एक खळबळजनक दावा केला आहे की, 'आमच्या मयुरीचीही वैष्णवीसारखीच परिस्थिती झाली असती'. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
दोन्ही कुटुंबीयांनी केलेले खळबळजनक खुलासे:
वैष्णवी हगवणे यांच्या आई-वडिलांनी तसेच मयुरी जगताप यांची आई आणि भावाने एकत्र येऊन अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. यादरम्यान, 'हगवणे कुटुंबातील सर्वात मोठी सून मयुरी यांच्या कुटुंबियांकडूनही हुंडा मागितला होता का?' असा प्रश्न विचारल्यावर मयुरी यांच्या भावाने अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 'हगवणे कुटुंबाचे बहुतांश भांडण वैष्णवीसोबत होते. त्यांनी आमच्याकडे हुंड्याची मागणी केली असती, मात्र जसजसे त्यांची वैष्णवी यांच्यासोबत भांडणे होऊ लागली तसतसे मयुरी आणि तिचे पती वेगळे राहू लागले. याचा परिणाम असा झाला की हगवणे कुटुंबीयांनी मयुरी आणि तिच्या नवऱ्याला आर्थिक मदत करणे बंद केले. जर आज ते एकत्र राहिले असते तर जे काही वैष्णवीसोबत झालं तेच मयुरीसोबतही झालं असतं,' अशी खळबळजनक माहिती मयुरी यांच्या भावाने, म्हणजेच मेघराज जगताप यांनी दिली.
हेही वाचा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दौऱ्यावर
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर फरार आहेत. सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरच्यांकडून लग्नात 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, अधिक महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी, वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट, माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी जावयाला 50 हजार ते 1 लाख रूपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पूर्ण न केल्यामुळे वैष्णवीचा छळ करण्यात आला होता. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाही, तर पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.