मुंबई : दादर येथील शिवसेना भवन येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हाप्रमुख आणि संपर्क प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीवर बोलताना, कोर्टात चिन्ह आपल्याला मिळेल, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी बैठकीत व्यक्त केला. तसेच चिन्ह आपल्याला मिळालं नाही, तरी ते गोठवलं जाईल, असंही वक्तव्य त्यांनी केलं. नुकतीच या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असून 4 ऑगस्ट ही सुनावणीची पुढील तारीख कोर्टाकडून देण्यात आली आहे.
पुढे बैठकीला संबोधित करताना ठाकरे म्हणाले की, ज्या पदाधिकाऱ्यांना जबाबदारी काही कारणाने पार पाडता येत नसेल, त्या पदाधिकाऱ्यांनी पद सोडावं. त्यांना इतर जबादारी दिली जाईल. तसेच 2029 च्या निवडणुकीला 3 वर्षच शिल्लक आहेत. निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे उद्धव ठाकरेंचे आदेश यावेळी दिले. पक्ष बांधणीकडे लक्ष देण्याच्या सूचना, जास्तीत जास्त संख्येने कार्यकर्ते जोडण्याचे आदेशही दिले. पक्षवाढीसाठी ही योग्य वेळ असल्याचाही उल्लेख त्यांनी केला. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीकडे लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले. दरम्यान, 8 ऑगस्ट SIR साठी अंतिम मुदत असल्याने आपापल्या विभागात, जिल्ह्यात जनतेची नोंदणी करून घेण्याकडे लक्ष देण्याच्या उद्धव ठाकरेंच्या सूचना दिल्या. SIR मध्ये कोणी वगळल जाणार नाही, हे पहा, अशा सूचना त्यांनी दिल्या.