पुण्यातील पोट निवडणुकांबाबत बोलताना काँग्रेससोबत चर्चा करणार असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. मुंबईतील माीतोश्रीवर उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची काल रात्री उशीरा बैठक पार पडली. बैठकीनंतर कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा आग्रह असल्याची माहिती जयंत पाटलांनी दिली.
कसबा मतदार संघातील आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड मतदारसंघातील आमदार लक्ष्मण जगताप या आमदारांचं निधन झाल्याामुळे पोटनिवडणूक होत आहे. या दोन्ही पोटनिवडणुका बिनविरोध व्हाव्यात यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. तर महाविकास आघाडी तिथं उमेदवार देणार, अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता निवडणूक बिनविरोध होणार की, चुरशीची होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कसबा आणि पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांनी परंपरा जपावी, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यांनी अंधेरी पोटनिवडणुकीचा दाखला दिला. यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्र्यांचे बरोबर आहे. परंपरा आहे, पण अंधेरीची निवडणूक सुद्धा बिनविरोध झाली नाही. भाजपने निवडणूक लढली नाही. मात्र नांदेड आणि पंढरपूर या दोन्ही ठीकाणी निवडणुका झाल्या. या दोन्ही मतदार संघात आमदारांच्या जवळचे नातेवाईक उभे होते तरी त्या निवडणुका झाल्या. अंधेरीची पोटनिवडणूक हा अपवाद होता. ती निवडणूक मुंबईत होती आणि भाजपला ती निवडणूक जिंकण्याची अजिबात संधी नव्हती, असे संजय राऊत म्हणाले.