मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित घडामोड अखेर प्रत्यक्षात येताना दिसत आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युतीचा तिढा सुटला असून, आज बुधवारी या ऐतिहासिक मैत्रीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाच्या मुद्द्यावरून रखडलेली ही चर्चा आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. शिवसेना (UBT) नेते खासदार संजय राऊत यांनी काल सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर “उद्या भेटू, 12 वाजता, हॉटेल ब्लू सी, वरळी” अशी पोस्ट करून या संभाव्य घोषणेकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.
या युती प्रक्रियेत सुरुवातीला जागावाटपावरून काहीसा पेच निर्माण झाला होता. साधारण 10 ते 15 जागांबाबत मनसेचे नेतृत्व पूर्णपणे समाधानी नसल्याने चर्चेच्या फेऱ्या लांबल्या होत्या. विशेषतः मुंबईतील मराठीबहुल पट्टे मानल्या जाणाऱ्या वरळी, शिवडी, दादर, माहीम, विक्रोळी आणि भांडुप या मतदारसंघांवर दोन्ही पक्षांनी आपला हक्क सांगितला होता.
शिवसेना (UBT) कडून “आधी युती जाहीर करू आणि नंतर राहिलेल्या जागांवर तोडगा काढू” असा प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र राज ठाकरे यांनी “आधी सर्व जागांचे वाटप पूर्ण करा आणि मगच घोषणा करा” असा ठाम पवित्रा घेतल्याने या प्रक्रियेला थोडा विलंब झाला.
आता हा सर्व वाद मिटल्याचे चित्र असून दोन्ही बाजूंच्या प्रमुख नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. मुंबईसह नाशिक, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि मिरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रातील जागावाटपाची चर्चा यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. विद्यमान नगरसेवक आणि कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन काही जागांची अदलाबदल करण्यात आली असून उमेदवारांना ‘एबी’ फॉर्मचे वाटपही सुरू झाल्याची माहिती समोर येत आहे. संजय राऊत यांनी स्पष्ट केले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात सातत्याने संपर्क असून दोन्ही पक्ष आता मनापासून एकत्र आले आहेत.
या युतीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवे समीकरण उदयाला येणार असून, प्रामुख्याने मराठी मतांचे होणारे विभाजन रोखणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे दिसते. भांडुप असो वा दादर, जागा कोणाकडेही गेली तरी आता ती ‘ठाकरेंच्या युतीची’ असेल, अशी भावना संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. आज दुपारी होणाऱ्या या अधिकृत घोषणेनंतर राज्याच्या आगामी निवडणुकांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीसमोर हे ‘ठाकरे कार्ड’ किती प्रभावी ठरणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.