बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी सत्ताधारी महायुतीची इच्छा होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उद्या, 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
याच पार्श्वभूमिवर सुनिल तटकरे म्हणाले की, “राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार उद्या आपला अर्ज दाखल करणार आहेत. आमच्या सर्वांसाठी अतिशय भावनाप्रधान आणि संवेदनशील प्रसंग आहे. पण ज्या पद्धतीने वहिनी सरकारमध्ये कामे करत आम्हाला उभारी देण्याचा प्रयत्न करतायत तेच आमच्यासाठी उद्याच्या भविष्याची वाटचाल करणारे आधारास्थभ आहे. वहिनींची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करतोय. महाविकास आघाडतील शरद पवार साहेबांच्या पक्षाने उमेदवारी देणारं नाही हे आधीच घोषित केलं त्याबद्दल त्यांचे आभार. उद्धवजी देखील उमेदवार देणारं नाहीयेत, काँग्रेससोबत देखील आम्ही संपर्क करतोय. काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासोबत कदाचित आज आमचं बोलणं होईल, त्यांना देखील आम्ही विनंती करणार आहोत. ज्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होतेय ती अतिशय संवेदनशील बाब आहे, 40 वर्ष अजित दादांनी वेगळा ठसा उमटवला. अशा वेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी ही सगळ्यांची नम्रतेची विनंती आहे. आमचे सगळ्यांना आवाहन आहे ज्या पद्धतीने दादांनी राज्यासाठी समर्पण केलंय, त्यांच्या अकाली निधनानंतर होणारी ही निवडणूक बिनविरोध व्हावी. “
हेही वाचा- Jay Pawar: ‘बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार साहेब प्रयत्न करतायत….’; जय पवार यांचे मोठे विधान
तसेच पुढे जय पवार यांच्या या विधानामुळे बारामती पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आता ‘बिनविरोध’ निवडीच्या चर्चेने जोर धरला आहे. यावर देखील सुनिल तटकरे यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं की, “जय पवार हे तरुण नेते आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्याचं युवा नेतृत्व आहे.. त्यामुळे त्यांनी भावना व्यक्त करणे हे योग्य आहे.. पक्ष संघटनेसाठी जय पवार यांनी केलेलं विधान महत्त्वाचं आहे.” “प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि मंत्रीमंडळातील सहकारी उद्या अर्ज भरायला उपस्थित असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील आम्ही विनंती केली होती. पण पूर्वनियोजित कार्यक्रममुळे ते येऊ शकणार नाही पण त्यांचा प्रतिनिधी येईल. राष्ट्रवादी पक्षाच्या सर्व आमदारांना आम्ही उद्या बारामतीला येण्यासाठी सूचित केलंय. शरद पवार आणि पवार कुटुंबीयांना सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरताना आम्ही येण्यासाठी विनंती करू.. बारामतीचे नेतृत्व पवार साहेब, अजित दादा आणि आता सुप्रिया सुळे करताय त्यामुळे यावं यासाठी विनंती करणार..”
जय पवारांनी केलेल्या VSR मालकाला अटक करण्याच्या मागणीवर तटकरे म्हणाले की, “जय पवारांची मागणी आहे तीच राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी.. अजित पवार यांच्या प्रकरणात तपास शीघ्र गतीने व्हावा. ज्या नेत्यांनी शंका उपस्थित केल्या त्या सर्वांच्या शंकेसह तपास करावा. मी ज्या वेळेस संसदेत होतो त्यावेळेस देश पातळीवरील विविध खासदारांनी दादा बद्दल हळहळ व्यक्त केली. त्यामुळे देशाला समजलं पाहिजेल की, दादांचा अपघात नेमकं कशामुळे झाला..”