तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाची (FDA) सूत्रे हाती घेताच राज्यात भेसळखोरांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. यामुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. गेल्या काही दिवसांपासून तुकाराम मुंढे यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांच्या चांगल्याच नांग्या ठेचल्या आहेत. अशातच अन्न व औषध प्रशासनाने मुंबईत दूध आणि दुग्धजन्य पदार्थ विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईदरम्यान परवाने, स्वच्छता, उत्पादन प्रक्रिया, साठवणूक आणि अन्नसुरक्षा नियमांचे पालन यांची तपासणी करण्यात आली. तपासणीत विविध अनियमितता आढळून आल्याने संबंधित विक्रेते आणि डेअरी आस्थापनांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यावेळी मरीन लाइन्सची प्रसिद्ध पारसी डेअरी , गोवंडी येथील सुफी डेअरी आणि मुलुंडमधील ‘मेसर्स असोसिएशन या तीन मोठ्या ठिकाणांवर एफडीएने धडक कारवाई केली आहे.
यात तिन्ही आस्थापनांचे परवाने थेट निलंबित करण्यात आले आहेत. मुंबईतील प्रसिद्ध पारसी डेअरीच्या काळबादेवी येथील आस्थापनेवर FDA ने तपासणी केली असता तेथे अनेक गंभीर त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यामुळे या डेअरीचा FSSAI परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे. त्याचसोबत गोवंडी येथील सुफी डेअरीमध्ये स्टेनलेस स्टीलच्या मिल्क चिलिंग टँकमध्ये तसेच प्लास्टिकच्या पिशव्या आणि कॅनमध्ये सैल पाश्चराईज्ड म्हशीचे दूध बेकायदेशीरपणे साठवून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले.
तर मुलुंड येथील मेसर्स असोसिएशन या दुग्धजन्य पदार्थांच्या दुकानात निष्काळजीपणा आणि नियमांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच लेबलिंगचे नियम धाब्यावर बसवल्यामुळे या आस्थापनेचाही परवाना निलंबित करण्यात आला आहे. यावेळी सुटे पनीर म्हणून विकला जाणारा पदार्थ 'चीज ॲनालॉग' असण्याची दाट शक्यता एफडीए अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ग्राहकांना सुरक्षित, दर्जेदार आणि भेसळमुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी FDA कडून पुढील काळातही अशा धडक तपासण्या सुरू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.