शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय बातमी होत नाही म्हणून काही लोक शरद पवार यांच्यावर टीका करत असतात. असे विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. तसेच नितीन गडकरी आणि शरद पवार हे सातत्याने इथेनॉल ऊस पीकावर बोलतात हा राजकीय नव्हे तर सामाजिक विषय आहे असेही सुळे म्हणाल्या. सध्या राज्यसभा निवडणुकीचा विषय प्राधान्याने आहे. त्या नंतर विधानपरिषद निवडणुकीचे पाहू.
बऱ्याच गोष्टी आम्ही टीव्हीच्या माध्यमातून ऐकत असतो. लोक काय बोलतात याचा आढावा घ्यावा लागेल. हा विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. कोणी काही बोलत असेल तर महाविकास आघाडीचे सर्व ज्येष्ठ नेते त्याबद्दल विचार करतील, असे हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्या म्हणाल्या. कश्मीरमध्ये पुन्हा कश्मीरी पंडितांना लक्ष्य केले जात आहे. त्यांचे पलायन सुरू झाले आहे, यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की केंद्र सरकार चित्रपटात व्यग्र आहेत, केंद्र सरकार सत्य परिस्थितीपासून दूर आहे. कश्मीरबाबत जे काही निर्णय घेण्यात आले ते अतिशय घाईने घेण्यात आले, त्याचे आज परिणाम दिसत आहेत. पाच दिवसांत सात जणांची हत्या करण्यात आली. यासाठी पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार आहे यावर त्यांना उत्तर द्यावेच लागेल असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
विदर्भात राष्ट्रीय काँग्रेसला उत्तम प्रतिसाद मिळत आहे, पक्षात चुकीच्या लोकांनी प्रवेश करू नये म्हणून जयंत पाटील प्रयत्न करत आहेत. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत आहे ही बाब दुर्दैवी असल्याचे सुळे म्हणाल्या. तसेच महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, मात्र दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षानंतर अशी गोष्ट होत आहे, कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी ही चांगली बाब नाही अशी सुळे म्हणाल्या.