Nalasopara : सोशल मीडियावर प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी आणि ‘व्ह्यूज’ वाढवण्यासाठी राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये करणे एका तरुणाला चांगलेच अंगाशी आले आहे. नालासोपाऱ्यातील या तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘मनसे स्टाईल’ने चोप देत त्याची अर्धनग्न धिंड काढली. या प्रकारामुळे सोशल मीडियावर थिल्लरपणा करणाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकी घटना काय?
सूरज शिर्के नावाच्या तरुणाने केवळ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रियता मिळवण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. त्याच्या अर्वाच्च भाषेमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट होती. सातत्याने मर्यादा ओलांडली जात असल्याचे पाहून मनसेचे पदाधिकारी किरण नकाशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या तरुणाचा शोध घेतला.
मनसे स्टाईल ‘धडा’
संतापलेल्या मनसैनिकांनी सूरज शिर्केला गाठून त्याला चांगलाच धडा शिकवला. कार्यकर्त्यांनी केवळ त्याला चोप दिला नाही, तर त्याची अर्धनग्न अवस्थेत सुमारे दीड किलोमीटरपर्यंत धिंड काढली. या कडक कारवाईनंतर सूरजने हात जोडून दोन्ही ठाकरे बंधूंची जाहीर माफी मागितली आहे.
“टीका सहन करू, पण शिवीगाळ नाही”
या घटनेवर मनसेने आपल्या अधिकृत ‘एक्स’ (ट्विटर) हँडलवरून भूमिका स्पष्ट केली आहे. “राजसाहेब आणि उद्धवजी यांच्याबद्दल व्ह्यूजसाठी कुणीही शिवीगाळ करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. टीकेची एक मर्यादा असते, पण प्रसिद्धीसाठी खालची पातळी गाठणाऱ्यांची महाराष्ट्र सैनिक अशीच धिंड काढतील,” असा इशारा मनसेने दिला आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
या घटनेमुळे राजकीय नेत्यांबद्दल सोशल मीडियावर अर्वाच्च भाषेत बोलणाऱ्यांना एक मोठा संदेश गेला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी नेत्यांचा अवमान करणे किती महाग पडू शकते, याचे हे ताजे उदाहरण असल्याची चर्चा सध्या रंगत आहे.