कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघर येथील टाटा कॅन्सर रुग्णालयात रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांच्या पाठपुराव्यामुळे याला यश आले आहे. कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येत असतात. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयातील रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने टाटा हॉस्पिटल मधील मनुष्यबळाची संख्या वाढवत तब्बल २४०५ तर रुग्ण खाटांची संख्या ९३० करण्यात आली आहे.
आमदार बालाजी बालदी म्हणाले, टाटा कॅन्सर हॉस्पिटल खारघर येथे सध्या स्थितीत दोन इमारती म्हणजेच रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला आणि लहान मुलांचे कर्करोग रोग केंद्र कार्यंवित केले आहे. त्यामुळे बेडची संख्या ४०० एवढी केली आहे. वाढती रुग्णसंख्या आणि आधुनिक तंत्रप्रणाली उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फोईड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सर रुग्णांची पूर्तता करणारे देहसातील सर्वात मोठे केंद्र या ठिकाणी सन २०२४ मध्ये कार्यंवित केले जाणार आहे. त्या अनुषंगाने या हॉस्पिटल मध्ये १९ ऑपरेशन थिएटरमुळे १० हजार मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रिया आणि ५ हजार रुग्णांना रेडिएशन थेरपी, २५ ते ३० हजार केमो थेरपी उपचार घेऊ शकणार असून जवळपास ३ लाख रुग्ण उपचार घेऊ शकणार आहे.