मुंबई, २८ जून २०२३, प्रतिनिधी: शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेवर येत्या १ जुलैला भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. पण अखेर मोर्चा काढण्याच्या मार्गात बदल करण्यात आल्यानंतर मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली आहे.
महानगरपालिकेवर प्रशासक राज आल्यापासून रस्त्याच्या कामात आणि खडीच्या कामात मोठे घोटाळे झाल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर या विरोधात ठाकरे गटाने मोर्चाची हाक दिली. या मोर्चाचा ठाकरे गटाने एक टीझरही शेअर केला. पण त्यानंतर प्रशासनाने कायदा सुव्यस्थेच्या पार्श्वभूमीवर मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे ठाकरे गट काय भूमिका घेणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. पण अखेर ठाकरे गटाच्या या भव्य मोर्चाला पोलिसांनी परवानगी दिली. मात्र, मोर्चाच्या मार्गात मोठा बदल करण्यात आला आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची पोलिसांबरोबर झालेल्या चर्चेनंतर या मोर्चाच्या मार्गात बदल करण्यात आला.
दरम्यान, आता ठाकरे गटाचा मोर्चा महापालिकेच्या समोरून जाणार आहे. तसेच मेट्रो सिनेमा ते आझाद मैदान असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यामुळे आता मेट्रो सिनेमा ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असणार आहे.