ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील एनसीसी युनिटच्या विद्यार्थ्यांचा मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ प्रकरणी स्थानिक पातळीवर सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करत विरोध दर्शवला. पण या व्हिडीओमध्ये काय सत्य आहे हे आम्ही जाणण्याचा प्रयत्न केला. सत्य जाणण्यासाठी विद्यार्थ्यांशी बातचीत केली.
व्हिडीओ ज्या पद्धतीने दाखवला जात आहे त्यातून गैरसमज निर्माण झाला आहे. आम्हाला दिले जाणारे शिक्षण हे अतिशय उत्तम प्रकारचे आहे. आम्हाला याबद्दल काहीही आक्षेप नाही. आमच्या पालकांनाही याबद्दल काही आक्षेप नाही. आम्हाला सैन्यात भरती व्हायचे असेल तर आणखी कठीण शिक्षण आणि सराव करावा लागणार आहे. यामुळे व्हिडीओ दाखवून केली जात असलेली बदनामी थांबवावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
प्रशिक्षण आणि या काळात चुका केल्यावर दिली जाणारी शिक्षा यातून मुलांना आणखी सक्षम केले जाते. हे करताना विद्यार्थ्यांची आवश्यक ती काळजी घेतली जाते. पण प्रशिक्षण अतिशय कठोर असते. याआधी कठोर प्रशिक्षण घेतलेल्या बांदोडकर महाविद्यालयाच्या पाच विद्यार्थ्यांची अग्निवीर म्हणून निवड झाली आहे. यामुळे व्हिडीओ दाखवून निर्माण केलेला गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. यासाठी व्हिडीओ वारंवार दाखवणे थांबवण्याची गरज आहे, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.