मुंबई : महायुतीला भरभरून मताधिक्य मिळाल्यानंतर नव्या सरकारचा शपथविधी दणक्यात करण्याचे नियोजन महायुतीच्या नेत्यांनी केले आहे. बहुमतात आलेल्या सरकारच्या शपथविधीसाठी जागांचा शोध सुरू आहे. शिवाजी पार्क मैदानावर सरकारचा शपथविधी नको असा सूर महायुतीतील काही नेत्यांनी व्यक्त केला आहे. शिवाजी पार्क मैदानाला ऐतिहासिक वारसा आहे आणि तेथे सभा करणं ही राजकीय पक्षांसाठी अभिमानाची बाब असली तरी नेत्यांचा शपथविधी सोहळा नको आहे, तेथे शपथविधी झाल्यास सरकार कार्यकाळ पूर्ण करत नाही असा एक तर्क सध्या चर्चेत आहे.
नव्या सरकारचा शपथविधी परंपरेनुसार राजभवनात संपन्न व्हायचा. पण राज्यात 1995 साली शिवसेना-भाजपा युतीचे सरकार आल्यावर त्यांनी शिवाजी पार्कवर भव्य-दिव्य शपथविधी सोहळा केला. महायुतीचे सरकार त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ त्यावेळी पूर्ण करू शकले नाही. त्यानंतरच्या 1999 च्या निवडणुकीत महायुती सरकार सत्तेवर आलं नाही. पुढे 2019 साली मविआ सरकारच्या शपथविधी सोहळ्याचे शिवाजी पार्क मैदानावर भव्य आयोजन करण्यात आले होते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील मविआ सरकारही अवघ्या अडीच वर्षातच कोसळले. त्यानंतर 2024 च्या निवडणुकीत मविआचा दारूण पराभव झाला. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानावर शपथविधी झालेले सरकार टिकत नसल्याचा तर्क महायुतीतील नेते आणि कार्यकर्त्यांनी बांधला आहे.
सुरूवातील मुख्यमंत्री कोण होईल यामुळे सरकार स्थापन होण्यासाठी विलंब होत होता आणि आता शपथविधीसाठी जागा ठरत नसल्याचे उशिर होत असल्याची चिन्ह आहेत. शिवाजी पार्कमध्ये शपथ घेतलेल्या एकहाही सरकारला आजपर्यंत त्यांचे सरकार टिकवता आले नाही असा तर्क लावत महायुतीच्या नेत्यांनी दादरमधील शिवाजी पार्कमध्ये शपथ घेण्यास नकार दिला आहे.
सुरूवातीला मुख्यमंत्री कोण असा पेच होता. परंतु महायुतीतील भाजपाला बहुमत मिळाल्याने भाजपाचा मुख्यमंत्री होईल यावर शिक्कामोर्तब झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यानंतर भाजपासाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला. कारण त्याआधी एकनाथ शिंदे हेदेखील मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याचे पाहायला मिळाले होते.