Gulbrao Patil: महाराष्ट्राच्या राजकारणात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी ठरल्यानंतर राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे. उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील 9 पैकी 6 खासदारांनी बंड पुकारत आपला वेगळा गट स्थापन केला असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या गटाला अधिकृत मंजुरीही दिली आहे. हा बंडखोर गट आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याच्या तयारीत असतानाच, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. शिंदे गटाचे फायरब्रँड नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी या संपूर्ण पडझडीला खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरत त्यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली आहे.
राऊतांच्या हाती सूत्रे आल्यापासून पक्षाची अधोगती
माध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दांत निशाणा साधला. पाटील म्हणाले की, "संजय राऊत यांनी जेव्हापासून पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली आहे, तेव्हापासून ठाकरे गटाची सातत्याने अधोगती होत चालली आहे. राऊत हे 'पांढऱ्या पायाचे' (अपशकुनी) माणूस असून, आता या माणसाचा पांढरा पाय काळा कसा करायचा, हेच आम्हाला पाहावे लागेल." दरम्यान, या मोठ्या फुटीनंतर मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी पक्ष सोडणाऱ्या बंडखोर खासदारांवर अत्यंत संतप्त भाषेत कडाडून टीका केली. यापूर्वीच्या फुटीनंतरही शिवसेना आपल्या स्वतंत्र चिन्हावर लढली होती, याची आठवण करून देत जनता या नेत्यांना निवडणुकीत नक्कीच जाब विचारले, असा इशारा राऊतांनी दिला.
'ते 6 खासदार गेले कुठे?' उदय सामंतांचा मिश्किल टोला
दुसरीकडे, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिल्लीतील घडामोडींवरून ठाकरे गटाची फिरकी घेतली आहे. दिल्लीत झालेल्या ठाकरे गटाच्या खासदारांच्या तातडीच्या बैठकीचा संदर्भ देत सामंत म्हणाले की, "तिथे झालेल्या बैठकीला फक्त 3 खासदार उपस्थित होते. उर्वरित 6 खासदार नक्की कुठे गायब झाले, हे मलाही समजेनासे झाले आहे." ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी या फुटीमुळे नाराज असल्याच्या प्रश्नावर त्यांनी, "आधी अंतिम निर्णय होऊ द्या, त्यानंतरच यावर बोलणे योग्य ठरेल," असे सूचक विधान केले. तसेच, अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्या सर्वोच्च पदाबाबत केलेल्या विधानाचा समाचार घेताना, "एक शिवसैनिक म्हणून शिंदे साहेब सर्वोच्च पदावर बसावेत ही आमची इच्छा आहेच, पण दानवेंच्या मनात नक्की काय चालले आहे, हे कोडं मला सुटलेलं नाही," असे सामंत म्हणाले.
ही तर पैशांच्या जोरावर सुरू असलेली अरेरावी: यशोमती ठाकूर
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला आहे. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी 'ऑपरेशन टायगर'वर हल्लाबोल करताना केंद्र आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. त्या म्हणाल्या की, "देशात सध्या एकाधिकारशाही आणि अरेरावीचे राजकारण सुरू आहे. कधी टीएमसी, कधी राष्ट्रवादी तर कधी शिवसेना फोडण्याचे काम सातत्याने केले जात आहे. या सर्व गोष्टी पूर्णपणे असंवैधानिक (बेकायदेशीर) मार्गाने सुरू आहेत."