त्रिपुरा हिंसाचार घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. त्रिपुरा येथील धार्मिक स्थळावर हल्ला झाल्याच्या निषेधार्थ मुसलमान संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. महाराष्ट्रातील नांदेड, मालेगाव, अमरावतीसह अनेक ठिकाणी आंदोलनाला गालबोट लागले आहे. त्रिपुरा येथे झालेल्या हल्ल्याविरोधात अमरावतीमध्ये मुस्लिमांचा भव्य मोर्चा काढण्यात आला. तसेच मुस्लिम मोर्चेकऱ्यांनी दुकानांवर दगडफेकसुद्धा केली.
त्रिपुरा येथे धार्मिक स्थळावर झालेल्या हल्ल्याविरोधात मुस्लिमांचा अमरावतीमध्ये भव्य मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम मोर्चेकऱ्यांनी शहरातील २०-२५ दुकानांवर दगडफेक करत दुकानांची तोडफोड केली. मुस्लिम मोर्चेकरांनी दगडफेक आणि तोडफोड केल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तसेच शहरात जातीय तणाव, भाजप कार्यकर्ते रस्त्यावर आले. त्रिपुरा येथे धर्मगुरू हजरत मोहंमद पैगंबर यांच्याबद्दल काही कट्टरपंथी यांनी अपशब्द वापरल्याच्या निषेधार्थ रजा अकादमी आणि इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्रात आंदोलने केली जात आहेत.
त्रिपुरा झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी शुक्रवारच्या नमाजनंतर हजारोंच्या संख्येने मुसलमान आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. अमरावतीत या आंदोलकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांनी मोर्चाच्या आडून अनेक दुकानांवर हल्ला चढवला आणि त्यातल्या ऐवजाची तोडफोड केली. आंदोलकांना नियंत्रित करायला पोलिसांना प्रयत्नांची शर्थ करावी लागली.
अमरावतीप्रमाणेच नांदेड येथेही मुसलमान युवकांनी त्रिपुरा येथील घटनेचा निषेध करत दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यापाऱ्यांनी विरोध केल्यानंतर हे युवक आक्रमक झाले. शुक्रवारी दुपारच्या नमाजानंतर शिवाजीनगर येथील दुकानांची नासधूस करत, व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली असा स्थानिकांचा आरोप आहे. यावेळी शिवाजी नगर, बरकत चौक, देगलूर नाका या भागात प्रचंड दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी मुख्य रस्त्यावर वाहन जाळत काचेच्या बाटल्याही फोडल्या असे सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या धडक कारवाईनंतर आंदोलकांना काबूत करण्यात आले. दरम्यान, शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.