मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अवघे 4 दिवस शिल्लक असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी महायुतीने आपला बहुप्रतिक्षित जाहीरनामा आज, 11 जानेवारी रोजी प्रसिद्ध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रामदास आठवले आणि मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांसह लाडक्या बहिणींकडे देखील लक्ष दिले गेले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरनाम्यातून लाडक्या बहिणींना खूश करण्यासाठी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. यात महिलांचे आरोग्य आणि सुरक्षा, महिला उद्योजकांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, प्रवासात मोठी सवलत देण्याचे घोषित करण्यात आले आहे.
1. मुंबई बेस्ट बसदरम्यान महायुतीने महिलांसाठी मोठे पाऊल उचलले आहे. महिलांना बेस्ट बस प्रवासात 50 टक्के सवलत देण्यात येणार आहे. शिवाय बसची संख्या 5,000 वरून 10,000 पर्यंत वाढवण्यात येणार असून प्रत्येक बस स्टॉपवर सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल डिस्प्ले आणि वाय-फायची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे.
2. महायुतीने महिलांना लघु उद्योग धोरण जाहीर केले असून महिला उद्योजकांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच कोळी भगिनींसाठी कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली जाणार आहे.
3. महिलांच्या गर्भाशयाचा कर्करोग आणि स्तनांच्या कर्करोगाच्या समस्यांवर तरतुदी म्हणून महापालिकेद्वारे मोफत तपासणी करण्यात येईल. तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी असुरक्षित वाटणाऱ्या भागात रस्त्याच्या कडेला दिव्यांची संख्या वाढवून प्रकाशाची व्यवस्था केली जाईल. ज्यामुळे कोणत्याही स्त्रियांना सामसूम रस्त्यावर भीती वाटणार नाही.