मुंबईच्या लालबाग परिसरातील पेरू कंपाऊंड परिसरात एका घरात महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेचा मृतदेह हा एका प्लॅस्टिक बॅगेत बांधून कपाटात बंद करून ठेवण्यात आला होता. मृत महिलेचे वय साधारणत: ५० ते ५५ असून ती तिच्या मुलीकडे राहत असल्याची माहिती प्राथमिक तपासात आढळली आहे. मुलीनेच आपल्या आईचा खून केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
डीसीपी प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, वीणा प्रकाश जैन असे महिलेचे नाव आहे. २२ वर्षीय मुलीला चौकशीसाठी अटक करण्यात आली आहे. मुलीनेच आईला अनेक महिने कोंडून ठेवल्याचा पोलिसांना संशय आहे. यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. हरवलेल्या अहवालाच्या आधारे घराची झडती घेतली असता महिलेचा मृतदेह सापडला.
या बाबत परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला लालबागच्या इब्राहिम कासिम इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहत असून ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने आणि भाच्याने मंगळवारी रात्री काळाचौकी पोलीस ठाण्यात दिली होती. तक्रार मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी इमारतीत आले.
त्यावेळी घरात शोध घेतला असता एका कपाटात प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. या प्रकरणी मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेतण्यात आले आहे. पोलिस तिची चौकशी केली जात आहे. महिलेची हत्या नेमकी कोणत्या कारणाने झाली हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर कळणार आहे.