मुंबई : उद्धव ठाकरे यांनी आज, राज्यव्यापी राम रक्षा आंदोलनाची घोषणा केली. येत्या रविवार, 5 जुलै रोजी संध्याकाळपासून राज्यभरात ठाकरे गट शिवसेनेकडून हे आंदोलन सुरु होणार आहे. राम मंदिर दान पेटीतील चोरीच्या मुद्द्यावर उद्ध ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून त्यांनी शिवसैनिकांना पुन्हा एकदा हिंदुत्वाची मशाल हाती घेण्याचे संकेत दिले आहेत. उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिवंगत भाजप नेते, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका वाक्याची आठवण करुन दिली. ‘अब हिंदू मार नही खायेगा’ असं वाजपेयी म्हणाले होते. आता मी म्हणेन ‘हिंदू माफ नही करेगा’. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनावर शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या वतीने पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
उद्धव ठाकरेंच्या आंदोलनावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राजकारणासाठी पैसा वापरला जातो असं बोलणं बालिशपणा आहे. पूर्वी राणा दाम्पत्यांने हनुमान चालीसा वाचली म्हणून अटक केली, आता हनुमान चालीसा वाचणार, या निमित्ताने तुम्हाला हनुमान चालीसा वाचायला मिळतेय. तुमच्या राजकारणासाठी आता हिंदूची गरज आहे. तुमच्या मिरवणुकीत नाचणारा मुसा, हे सगळं बेगडी प्रेम आहे. हिंदुंचा नारा देऊन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घ्या. ज्या पक्षाला सोबत घेतले, त्यांना तुमचे हिंदुत्व मान्य आहे का विचारा. सगळ्याच चुकांचा पश्चाताप करण्यासाठी दादरला जाऊन हनुमान चालिसा वाचावी आणि हनुमानाकडे चुकले म्हणून माफी मागा”, अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
पुढे त्यांनी नमूद केले की, “ज्याने लूट केली असेल, त्याला आम्ही माफ करणार नाही. ही सगळ्यांची भूमिका आहे. जिथे श्रध्दा आहे तिथे लूट होऊ नये. राममंदिराची रथयात्रा अडवाणी यांनी काढली तेंव्हा मोठा प्रतिसाद मिळाला. घुमट पाडल्यानंतर एकमेव शेर, वाघ बाळासाहेबांनी शिवसैनिक असतील तर मला गर्व आहे असं वक्तव्य केलं होतं . त्याचं क्रेडिट घेऊ नका, ते श्रेय फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे आहे. संघर्षाच्या काळात आम्ही अयोध्येला गेलो होतो. म्हणजे अमित शहा यांना राम पावत नाही तो पर्यंत तुम्ही जाणार नाही असे म्हणायचे का?हनुमान चालीसा वाचून तुम्ही हिंदूंची माफी मागणार आहात का? रामाच्या नावावर राजकारण करण्याची नवी दिशा देण्याचा प्रयत्न करू नये. हिंदुंशी त्यांचा आता काडीमात्र संबंध नाही. अगोदर पक्षाला जागे करा, स्वतः जागे व्हा, आजूबाजूला असलेल्या चांडाळ चौकडीला जागे करा मग देशाचा विचार करा.”