इतरांच्या आयुष्यातील अडचणी दूर करण्यासाठी तंत्र-मंत्र करण्याचा दावा करणारा भोंदू अशोक खरात स्वत: मोठ्या अडचणीत आला आहे. श्रद्धेचा बाजार मांडून अध्यात्माच्या नावाखाली वासनेचा आणि काळ्या पैशांचा महाल उभारणारा नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरात केवळ निष्पाप महिलांचे लैंगिक शोषण करत नसून भक्तीच्या नावाखाली आर्थिक गैरव्यवहारांचे एक महाकाय जाळे विणायचा.
नाशिकमधील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ आणि गुरू कॅप्टन अशोक खरात या भोंदूबाबाचा दुहेरी चेहरा उघड झाला आहे. भारतात ‘गुरू’ असलेला अशोक खरात विदेशात मात्र लक्झरी लाईफ जगताना पाहायला मिळाला आहे. दक्षिण कोरियातील अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी कुटुंबासोबत परदेशात मौजमजा करतानाचे दृश्य समोर आले आहेत.
यावेळी खरातने तब्बल 150 परदेश दौरे केल्याची माहिती समोर आली आहे. या दौऱ्यांसाठी वापरलेला पैसा कुठून आला? याचा तपास सुरू असून पोलिसांकडून खरातच्या विदेशी ट्रिप्स रडारवर आल्या आहेत. दरम्यान खरातच्या पासपोर्ट, ट्रॅव्हल हिस्ट्री आणि खर्चाची चौकशी होणार आहे. यावेळी खरातने भोंदूगिरीतून कमावलेला पैसा विदेशात उधळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. खरातच्या आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला नवं वळण लागण्याची शक्यता आहे.