शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी निधन झाले. गेल्या आठवडाभरापासून त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि न्युमोनियाच्या उपचारांदरम्यान वयाच्या शंभरीत त्यांची प्राणज्योत मालवली. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाचे दु:ख शब्दापलिकडचे आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनामुळे इतिहास आणि सांस्कृतिक विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. त्यांच्यामुळे पुढच्या पिढ्या छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडल्या जातील तसेच अन्य क्षेत्रातील त्यांचे योगदानही कायम स्मरणात राहील.
I am pained beyond words. The demise of Shivshahir Babasaheb Purandare leaves a major void in the world of history and culture. It is thanks to him that the coming generations will get further connected to Chhatrapati Shivaji Maharaj. His other works will also be remembered. pic.twitter.com/Ehu4NapPSL— Narendra Modi (@narendramodi) November 15, 2021
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ते म्हणाले, ‘बाबासाहेब पुरंदरे यांचे दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून मन अत्यंत व्यथित झाले आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गौरवपूर्ण चरित्र जनमानसात रुजवण्याचे भगीरथ कार्य केले. जाणता राजा नाटकाच्या माध्यमातून त्यांनी धर्मरक्षक शिवछत्रपतींची जीवनगाथा तरुणांपर्यंत पोहोचवली. काही वर्षांपूर्वी पुरंदरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी विस्तृत चर्चा करण्याचे सौभाग्य लाभले. त्यांची ऊर्जा व विचार प्रेरणादायी होते. आज त्यांच्या निधनाने एका युगाचा अंत झाला आहे. त्यांचे कुटुंबीय व प्रशंसकांच्या प्रति संवेदना व्यक्त करतो. आई भवानीच्या चरणी त्यांना चिरशांती लाभो.’ अशा शब्दांत अमित शहा यांनी बाबासाहेबांना श्रद्धांजली वाहिली आहे.
दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाची माहिती दिली. पद्मविभूषण शिवशाहीर बाबसाहेब पुरंदरे यांचे रुग्णालयात उपचार घेत असताना वृद्धापकाळाने आज सकाळी ५.०७ मिनिटांनी दु:खद निधन झाले असल्याचे रुग्णालय प्रशासनाने पत्रकाद्वारे कळवले आहे.