पैशांसाठी जन्मदात्या आईचा मुलांनी गळा अवळून केला निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मालेगावच्या दाभाडी येथे ही संतापजनक घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपी मुलांना अटक आहे. दारू पिण्यासाठी पैसे देत नाही म्हणून व्यसनाच्या आहारी गेलेल्या दोन मुलांनी आपल्या जन्मदात्या आईचा दोरीने गळा अवळून निर्घृणपणे खून केला. ही संतापजनक घटना मालेगावच्या दाभाडी येथे घडली आहे. सुलकनबाई सोनवणे, असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भगवान सोनवणे आणि संदीप सोनवणे दोघांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरुद्ध छावणी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आई -मुलाच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे मालेगाव तालुका हादरला असून नराधम मुलांना कडक शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.
सुलकनबाई या मोठा मुलगा भगवान किसन सोनवणे व लहान मुलगा संदीप किसन सोनवणे यांच्यासोबत राहत होत्या. पैशांच्या कारणावरुन दोन्ही मुले त्यांच्याशी वाद घालत होते. त्यातून भगवान आणि संदीप यांनी सुलकनबाई यांचा दोरीने गळा आवळून खून केला. प्रारंभी दोघांनी सुलकनबाईने आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र, पोलिसांनी चौकशी केल्यानंतर दोघांनी गळा घोटून मारल्याची कबुली दिली. सुलकनबाई यांचे पती गिसाका कारखान्यात वॉचमन होते. पतीच्या मृत्यूनंतर सुलकनबाई यांनी मुलांचा सांभाळ केला. पतीला मिळालेल्या पैशांतून त्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. याच पैशाची सातत्याने मागणी करुन मुले त्यांच्याशी वाद घालत असल्याचे समोर आले आहे.