BJP vs Shiv Sena: छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील वाद आता विकोपाला गेला असून, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. “भाजपने चर्चेपासून आम्हाला दूर ठेवून आमचा विश्वासघात केला आणि केसानं गळा कापला,” अशा तिखट शब्दांत सत्तार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. या राजकीय घडामोडींमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून युतीमध्ये मोठी दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
सत्तेच्या गणितात शिवसेना शिंदे गट बाजूला; भाजपचा वरचष्मा
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपने विशेष खेळी करत शिवसेना शिंदे गटाला सत्तेपासून दूर ठेवले आहे. सध्या जिल्हा परिषदेवर भाजपचाच अध्यक्ष आणि उपाध्यक्ष विराजमान झाला आहे. सत्तार यांच्या मते, भाजप सुरुवातीपासूनच हा डाव साधत होती. “आमच्या पाच-सहा सदस्यांना फोडून बाहेर नेले गेले, तेव्हाच आम्हाला शंका आली होती. मात्र, मी कौटुंबिक दुःखामध्ये असल्याने त्यावेळी हस्तक्षेप करू शकलो नाही,” असे त्यांनी नमूद केले. उदय सामंत आणि रवींद्र चव्हाण यांच्यात चर्चा होऊनही झालेला हा ‘धोका’ अनाकलनीय असल्याचे त्यांनी सांगितले. अब्दुल सत्तार यांनी इशारा दिला आहे की, या विश्वासघाताचे परिणाम आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत भाजपला भोगावे लागतील. “जर आमच्या आणि त्यांच्या वरिष्ठांनी यामध्ये वेळीच हस्तक्षेप केला नाही आणि दोन्ही बाजूंना विश्वासात घेऊन वाटचाल केली नाही, तर भविष्यातील युती धोक्यात येईल,” असे सत्तार स्पष्टपणे म्हणाले. त्यांनी संभाजीनगर राजकीय परंपरेचा दाखला देत सांगितले की, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंपासून येथे शिवसेनेची सत्ता राहिली आहे, परंतु भाजपने या परंपरेला धक्का लावला आहे.
पुढची दिशा आणि रणनीती ठरणार
विश्वासाने एकत्र काम करण्याच्या काळात भाजपने केलेल्या या कृतीमुळे शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. “विश्वासघात करणाऱ्यांना जनतेच्या न्यायालयात जावे लागेल,” असे म्हणत सत्तार यांनी आगामी संघर्षाचे संकेत दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणावर आता शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार असून, त्यानंतरच महायुतीतील पुढची रूपरेषा आणि दिशा ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.