Amrit Bharat Express: देशातील सर्वात व्यग्र रेल्वे मार्ग असलेल्या मुंबई-अहमदाबाद दरम्यान आता 'अमृत भारत एक्सप्रेस' धावणार आहे. रेल्वे बोर्डाच्या हिरव्या कंदीलानंतर आज, शुक्रवार 23 जानेवारीपासून या गाडीच्या दोन दिवसीय तांत्रिक चाचण्यांना (Trial Runs) सुरुवात होत आहे. सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात हायस्पीड प्रवासाचा अनुभव देणे, हा या रेल्वेचा मुख्य उद्देश आहे.
काय आहे 'पुश-पूल' तंत्रज्ञान?
या एक्सप्रेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची 'पुश-पूल' (Push-Pull) यंत्रणा. यामध्ये रेल्वेच्या दोन्ही टोकांना इंजिन जोडलेले असते. यामुळे गाडीला वेग पकडण्यासाठी कमी वेळ लागतो. स्थानकावर इंजिन बदलण्याची कसरत करावी लागत नाही, ज्यामुळे प्रवासाचा वेळ वाचतो. ही गाडी ताशी 130 किमी वेगाने ही गाडी धावू शकते.
कशी होणार चाचणी?
रिसर्च डेव्हलपमेंट अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशनच्या (RDSO) देखरेखीखाली ही चाचणी घेतली जात आहे. यात पूर्ण वेगाने धावताना डबे आणि इंजिनची हालचाल किती स्थिर आहे, ब्रेकिंग यंत्रणा आणि सस्पेन्शनची कामगिरी तसेच 130 किमी वेगासाठी रुळ, ओव्हरहेड वायर आणि सिग्नलची सज्जता तपासण्यात येईल.
चाचणीचे वेळापत्रक –
23 जानेवारी: सकाळी 9 वाजता – अहमदाबाद ते मुंबई सेंट्रल.
24 जानेवारी: सकाळी 9 वाजता – मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद.
सामान्य प्रवाशांना 'लक्झरी'चा अनुभव
दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेसप्रमाणेच वेगवान असूनही, अमृत भारत ही पूर्णपणे नॉन-एसी असल्याने तिचे तिकीट दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असतील. आधुनिक सुविधांनी सज्ज असलेले एलएचबी डबे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी बनवतील. या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर लवकरच ही गाडी नियमित सेवेत दाखल होणार आहे.