राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मॅरेथॉन बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ अखेर निष्फळ ठरले असून, महायुतीमध्ये उभी फूट पडली आहे. जागावाटपाच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला पेच सुटण्याऐवजी तो अधिकच विकोपाला गेला आणि अखेर भाजप व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. अशातच महायुतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ऐनवेळी निष्ठावंताना उमेदवारी नाकारात आयारामांना तिकीट दिल्याने शिवसेनेत मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थित आता शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांनी राज्यात एकूण 14 ठिकाणी स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शिंदे गट आणि भाजप यांच्यातील युती तुटल्याचे दृष्य समोर येत आहे.
हेही वाचा- Mahapalika Election 2026 : महायुतीचे सूर जुळेनात, संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेचा स्वबळाचा नारा; ठाकरे गटाला संधी?
राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महायुतीमध्ये जागावाटपावून शिंदे आणि भाजपचे शिलेदार इरेला पेटल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही पक्षांमध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नांदेड, अमरावती, मालेगाव, अकोला, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, धुळे, उल्हासनगर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, जालना या महानगरपालिकांच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवतील. जागांच्या वाटपावरून दोन्ही पक्षांतील नेत्यांमध्ये एकमत होऊ शकले नाही. भाजपच्या एका विशिष्ट प्रस्तावामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. महायुतीमधील या बिघाडीमुळे तिरंगी किंवा चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या या वादामुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता असून, याचा थेट फायदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला होणार का? यावर आता राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.