ठाणेकरांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. ठाणे शहरातील काही भागांमध्ये आज दुपारी 12 वाजता नळाचे पाणी जाणार आहे. दुपारच्या बारा वाजेपासून पुढचे 24 तास ठाण्यातील काही भागांमध्ये पाणी येणार नाही. यामुळे नागरिकांनी पाण्याचा साठा करुन ठेवण्याचा आणि पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करण्याचं आवाहन ठाणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
पाणी कपातीमागील दोन मुख्ये कारणं
आगामी काळात पाऊस सरासरीपेक्षा काहीसा कमी होणार असल्याचा अंदाज आहे. या दरम्यान धरणातील पाणीसाठा याचा विचार करता हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी पाणी कपात केली जाणार आहे.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आले आहे. तरी सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करावा असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.
कोणत्या भागात पाणी राहणार बंद?
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा -मानपाडा आणि वागळे (काही भागात) प्रभागसमितीमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. सदर शटडाऊन कालावधीत ठाणे महानगरपालिके अंतर्गत दिवा, मुंब्रा (प्रभाग क्र. 26 व 31 चा काही भाग वगळता) आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागामध्ये व वागळे प्रभाग समिती मधील रुपादेवी पाडा, किसननगर नं. 2, नेहरुनगर तसेच मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत कोलशेत खालचा गाव येथील पाणीपुरवठा 24 तासासाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.