तामिळनाडू: सिनेमाच्या चंदेरी पडद्यावर शंभर शत्रूंना एका फटक्यात लोळवणारे 'थलापती' विजय हे आता राजकारणाच्या खऱ्या रणांगणावर बहुमताचा आकडा गाठताना काहीसा अडखळताना दिसत आहेत. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सुपरस्टार विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाने सर्वाधिक जागा मिळवून मोठी झेप घेतली असली, तरी सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा 'जादुई आकडा' गाठताना त्यांची दमछाक होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा एकदा 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा जुना खेळ सुरू झाला असून, अण्णाद्रमुकने त्यांच्या आमदारांची तटबंदी करण्यास सुरुवात केली आहे.
बहुमतापासून काही पावले दूर
तामिळनाडू विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 118 या बहुमताच्या आकड्याची आवश्यकता आहे. थलापती विजय यांच्या 'टीव्हीके' पक्षाने 106 जागांवर विजय मिळवून जोरदार मुसंडी मारली आहे. काँग्रेसने विजय यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्यांच्या सत्तेचा मार्ग सुकर होईल असे वाटत होते, मात्र अद्यापही काही जागांची उणीव भासत आहे. हे उरलेले संख्याबळ जमवण्यासाठी विजय यांच्या गोटात सध्या हालचालींना वेग आला आहे. मात्र, ही आकडेमोड पूर्ण होण्याआधीच विरोधी गोटात हालचाली तीव्र झाल्या आहेत.
तामिळनाडूत रिसॉर्ट पॉलिटिक्स
राजकीय घोडेबाजार टाळण्यासाठी अण्णाद्रमुक (AIADMK) पक्षाने अत्यंत सावध पवित्रा घेतला आहे. पक्षाचे 47 आमदार निवडून आले असून, त्यापैकी 28 आमदारांना तातडीने शेजारील केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील एका आलिशान रिसॉर्टमध्ये हलवण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते कोवई सत्यन यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून, आमदारांना सुरक्षित ठेवणे ही पक्षाची प्राथमिकता असल्याचे म्हटले आहे. एडापाडी के. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वाखालील अण्णाद्रमुकने सुरुवातीला विजय यांच्या पक्षाला सरकार स्थापनेसाठी बिनशर्त पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते, मात्र आता चित्र बदलताना दिसत आहे.
अण्णाद्रमुकचा 'यू-टर्न' अन् सत्तेचा पेच
मंगळवारपासून अण्णाद्रमुक आणि टीव्हीके यांच्यात सत्ता स्थापनेबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू होत्या. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारपासून टीव्हीके पक्षाकडून अण्णाद्रमुकला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. या संवादहीनतेमुळे संतप्त झालेल्या अण्णाद्रमुकने आपला पाठिंबा मागे घेण्याचा विचार सुरू केला आहे. जर अण्णाद्रमुकने पाठिंबा नाकारला, तर थलापती विजय यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची खुर्ची गाठणे कठीण होणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात 'किंगमेकर' कोण ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
विजय यांच्या सुरक्षेत मोठी कपात
एकीकडे सत्तेचा संघर्ष सुरू असताना दुसरीकडे थलापती विजय यांच्या सुरक्षेबाबत घेतलेल्या एका निर्णयाने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. निवडणुकीच्या निकालानंतर त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या दर्जाची 'झेड प्लस' (Z+) सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. मात्र, बुधवारी रात्री तामिळनाडू पोलिसांनी या सुरक्षेत मोठी कपात केली आहे. डझनभर सशस्त्र कमांडो आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा ताफा आता विजय यांच्यासोबत नसून सुरक्षा किमान स्तरावर आणली आहे. विशेष म्हणजे, खुद्द विजय यांनीच हा विशेष प्रोटोकॉल नको असल्याची विनंती पोलिसांना केली होती, अशी माहिती समोर आली आहे.
राजकारणातील सस्पेन्स कायम
निवडणूक निकालाच्या निकालात टीव्हीकेला मोठे यश मिळाल्याने 4 मे 2026 रोजीच विजय यांच्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता सत्ता स्थापनेची जुळवाजुळव सुरू असतानाच झालेला हा बदल आणि दुसरीकडे पुद्दुचेरीमधील रिसॉर्टवर आमदारांचा मुक्काम, यामुळे तामिळनाडूचे राजकारण एका अशा वळणावर येऊन ठेपले आहे जिथे पुढे काय होईल, याचा अंदाज बांधणे कठीण झाले आहे. येत्या 24 तासांत तामिळनाडूच्या राजकारणात कोणत्या मोठ्या उलथापालथी होतात, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.