चेन्नई: तमिळनाडूच्या राजकारणात सध्या एखाद्या ब्लॉकबस्टर चित्रपटापेक्षाही मोठा 'सस्पेन्स' पाहायला मिळत आहे. रुपेरी पडद्यावर अशक्य गोष्टी शक्य करणाऱ्या थलपती विजय यांच्यासाठी सत्तेचा सिंहासन गाठणे आता अशक्य झाले आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 108 जागा जिंकूनही विजय यांच्या 'तमिळगा वेत्री कळघम' (TVK) पक्षाला बहुमताच्या 118 या जादूई आकड्याने हुलकावणी दिली आहे. "हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणे" काय असते, याचा प्रत्यय सध्या विजय यांना येत असून, राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दशकांपासून एकमेकांचे तोंड न पाहणारे दोन कट्टर शत्रू पक्ष आता एकत्र येण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमतासाठी 118 आमदारांची आवश्यकता आहे. विजय यांच्या पक्षाला 108 जागा मिळाल्या असल्या, तरी स्वतः विजय दोन मतदारसंघांतून निवडून आल्याने तांत्रिकदृष्ट्या त्यांचे संख्याबळ 107 वर आले आहे. काँग्रेसच्या 5 आमदारांनी त्यांना पाठिंबा जाहीर केल्याने ही बेरीज 112 पर्यंत पोहोचली आहे, परंतु तरीही बहुमतासाठी 6 आमदारांची कमतरता भासत आहे. राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी अत्यंत कडक भूमिका घेत, जोपर्यंत 118 आमदारांच्या प्रत्यक्ष पाठिंब्याचे पत्र सादर केले जात नाही, तोपर्यंत सत्तास्थापनेचे निमंत्रण देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. या 'संविधानिक तांत्रिकते'मुळेच थलपतींचा राज्याभिषेक सध्या थांबला आहे.
विजय यांच्या या राजकीय कोंडीचा फायदा घेण्यासाठी राज्यातील प्रस्थापित शक्तींनी कंबर कसली आहे. ज्या 'द्रमुक' (DMK) आणि 'अण्णाद्रमुक' (AIADMK) पक्षांनी आजवर एकमेकांविरुद्ध रणांगण गाजवले, ते आता विजय यांना सत्तेपासून रोखण्यासाठी "शत्रूचा शत्रू हा मित्र" या उक्तीप्रमाणे एकत्र येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अण्णाद्रमुकने एम. के. स्टॅलिन यांच्याकडे पाठिंब्याची मागणी केली असून, द्रमुकनेही स्टॅलिन यांना सर्व निर्णयांचे सर्वाधिकार बहाल केले आहेत. 59 आमदार असलेल्या द्रमुक आणि 53 आमदार असलेल्या अण्णाद्रमुकची एकत्रित बेरीज 112 होत असली, तरी त्यांच्या मित्रपक्षांच्या बळावर ते 118 चा आकडा पार करण्याचा प्रयत्न करत आहेत.
राजकीय वर्तुळातील या नव्या हालचालींमुळे थलपती विजय यांच्या गोटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. एडप्पाडी पलानीस्वामी आज राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता असून, त्यांच्याकडे मित्रपक्षांसह किती आमदारांचा पाठिंबा आहे, यावर तमिळनाडूचे भविष्य अवलंबून असणार आहे. जर खरोखरच द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन ध्रुव एकत्र आले, तर तमिळनाडूच्या इतिहासातील ही सर्वात मोठी आणि अनपेक्षित युती ठरेल. या 'महायुती'मुळे थलपती विजय यांना सत्तेच्या उंबरठ्यावरून मागे फिरावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
एकूणच, तमिळनाडूत सध्या राजकीय शह-काटशहाचा खेळ शिगेला पोहोचला आहे. एका बाजूला सुपरस्टारची 'ब्रँड व्हॅल्यू' आणि जनतेने दिलेला सर्वाधिक कौल आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रस्थापित पक्षांची वर्षानुवर्षांची राजकीय 'फिल्डिंग' आहे. राज्यपालांच्या दरबारात 118 आमदारांचे स्वाक्षरी असलेले पत्र कोण आधी सादर करणार, यावरच तमिळनाडूचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल, याचे उत्तर मिळणार आहे. थलपतींचा विजय की प्रस्थापितांचा 'मास्टरस्ट्रोक', याकडे आता संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.