मुंबई: दोन भाऊ, दोन नेते एकत्र येतात, ही मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी आणि सकारात्मक घडामोड आहे. या एकत्र येण्यामागे कोणतेही वैयक्तिक हित नसून मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाचीच चर्चा झाली पाहिजे, असे स्पष्ट मत शिवसेना (ठाकरे गट) खासदार Sanjay Raut यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
संजय राऊत यांनी सांगितले की, ज्येष्ठ दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि ते स्वतः मिळून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेणार आहेत. मांजरेकर मोठे कलाकार असले, तरी ते आधी मुंबईकर आहेत आणि मुंबईच्या प्रश्नांवर त्यांची ठाम भूमिका आहे, असेही राऊत यांनी नमूद केले.
निवडणूक प्रचाराबाबत माहिती देताना राऊत म्हणाले की, 9 तारखेला राज ठाकरे यांची पहिली सभा नाशिकमध्ये होणार आहे, तर उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये सभा घेणार आहेत. “आम्हाला सभा कधी घ्यायच्या, कशा घ्यायच्या, हे शिकवण्याची गरज नाही,” असा टोला त्यांनी लगावला. मुंबईतील काही मैदाने आधीच आरक्षित असतानाही, शिवसेना आणि मनसेला सभा घेता येऊ नयेत, यासाठी सरकारची ‘राक्षसी वृत्ती’ काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीवर बोलताना राऊत म्हणाले की, सभा घेण्यापेक्षा थेट कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचणे, ही त्यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे. मुंबईत एकच मोठी विराट सभा घ्यावी, यावर दोन्ही पक्षांमध्ये एकमत झाले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पक्षांतर्गत बंडखोरीच्या मुद्द्यावर राऊत म्हणाले की, बंडखोरांना समजावून सांगण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यांच्या मनातील गैरसमज दूर झाले की, राग शांत होईल आणि बंडखोरही शांत होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेना नेते संतोष धुरी यांच्या पक्षांतरावर बोलताना राऊत यांनी तीव्र शब्दांत टीका केली. “जे मुंबईचे दुश्मन आहेत, जे मुघल वृत्तीचे आहेत, त्यांच्या तंबूत जाऊन बसणं ही दुर्दैवी बाब आहे,” असे ते म्हणाले. भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल करताना त्यांनी म्हटले की, “भाजपाचे नेमकं काय वेड लागलंय, हे कार्यकर्त्यांनाही कळत नाही. पण हे लक्षात ठेवा, तुमच्या पुढच्या पिढ्या सुखी राहणार नाहीत.”
भाजपावर गंभीर आरोप करत राऊत म्हणाले की, भाजपाला छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, पंडित नेहरू, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्या आठवणी आणि कार्य पुसायचे आहेत. “आयत्या पिठावर रेघोट्या ओढण्याचं काम भाजप करत आहे. पण प्रत्येक गोष्टीला अंत असतो आणि भाजपचा अंतही होईल, हे लिहून ठेवा,” असा इशाराही त्यांनी दिला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही राऊत यांनी गंभीर आरोप केले. “कोरोना झाला असल्याचं नाटक करून बनावट रिपोर्ट तयार करण्यात आला. जशी बनावट शिवसेना तयार केली, तसाच बनावट कोरोना रिपोर्ट तयार करून बेडवर झोपून सह्या केल्या गेल्या,” असा आरोप त्यांनी केला.
याउलट, उद्धव ठाकरे यांनी कोरोना काळात घेतलेले निर्णय संपूर्ण जगाला माहिती आहेत, असे राऊत म्हणाले. त्या काळातील कामाची जागतिक आरोग्य संघटनेने दखल घेतली होती. आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रांनीही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील कामगिरीचे कौतुक केले होते. विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्या काळात उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक केले होते, याची आठवण करून देत राऊत यांनी भाजपवर पलटवार केला.
एकूणच, येत्या काळात ठाकरे बंधूंच्या एकत्रित भूमिकेमुळे मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल घडतील, असा स्पष्ट संदेश संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेतून दिला.