तेहरान: ज्या ठिणगीची भीती संपूर्ण जगाला वाटत होती, तिचे आता भीषण वणव्यात रूपांतर झाले आहे. पश्चिम आशियातील तणावाने आता रौद्र रूप धारण केले असून, अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणच्या काळजावर घाला घातला आहे. इतिहासात पहिल्यांदाच इस्रायली क्षेपणास्त्रांनी इराणची राजधानी तेहरानमधील तेल डेपो आणि रिफायनिंग सुविधांना लक्ष्य केले. या हल्ल्याची तीव्रता इतकी प्रचंड होती की, संपूर्ण तेहरान शहरावर आगीचे उंच लोळ आणि काळकुट्ट धुराचे लोट पसरले आहेत. रात्रीच्या अंधारात पेटलेल्या या तेल साठ्यांमुळे तेहरानचे आकाश रक्तासारखे लाल झाले असून, या युद्धधुमाळीने जागतिक अर्थव्यवस्थेच्या नाडीवरच पाय दिला आहे.
इस्रायली संरक्षण दलाने या मोहिमेला ‘सर्जिकल स्ट्राईक’पेक्षाही मोठे स्वरूप दिले आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे, तेहरानमधील ‘शाहरान’ या महत्त्वाच्या तेल डेपोवर अचूक मारा करण्यात आला. या डेपोतून निघणाऱ्या आगीच्या ज्वाळांचे उपग्रहीय चित्रण आता समोर आले असून, इराणची आर्थिक रसद तोडण्याचा हा इस्रायलचा सर्वात मोठा प्रयत्न मानला जात आहे. विशेष म्हणजे, या तेल डेपोतून चीनसह अनेक आशियाई देशांना इंधनाचा पुरवठा केला जातो. त्यामुळे हा हल्ला केवळ इराणवर नसून, जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर झालेला हा मोठा हल्ला असल्याचे मानले जात आहे.
आयडीएफने निवेदनात या हल्ल्याचे समर्थन करताना म्हटले आहे की, “इराणची दहशतवादी राजवट या इंधन साठ्यांचा वापर त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधा चालवण्यासाठी आणि छुप्या युद्धाला खतपाणी घालण्यासाठी करत आहे.” इराणमधील विविध लष्करी संस्थांना पुरवले जाणारे इंधन रोखणे हाच या हल्ल्याचा मुख्य उद्देश होता. इस्रायलच्या मते, इराणची लष्करी ताकद खिळखिळी करण्याच्या दिशेने हे एक निर्णायक पाऊल आहे. “शत्रूच्या घरात शिरून त्याच्या शक्तीचे केंद्र उद्ध्वस्त करणे” या रणनीतीचा भाग म्हणून या मोहिमेकडे पाहिले जात आहे.
Tehran's largest oil depot up in flames ? A reminder that China imports 15% of its oil from Iran. No longer.pic.twitter.com/bGdxWSECNk — Dr. Eli David (@DrEliDavid) March 7, 2026
दुसरीकडे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात शहीद झालेल्या अमेरिकन सैनिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना ट्रम्प यांचा जुना आक्रमक अवतार पुन्हा पाहायला मिळाला. त्यांनी इराणला तंबी दिली असून, “जर इराणने विघातक कारवाया त्वरित थांबवल्या नाहीत, तर हल्ल्यांची ही मालिका केवळ सुरुवात असेल,” असा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या लष्करी ताकदीचा पुनरुच्चार करताना, इराणला चारीमुंड्या चीत करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल सज्ज असल्याचे स्पष्ट केले आहे.
या हल्ल्यामुळे इराणमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. इराणचे वरिष्ठ अधिकारी अली लारीजानी यांनी अमेरिकेला थेट इशारा दिला असून, “या आगीची किंमत वॉशिंग्टनला मोजावी लागेल,” असे म्हटले आहे. लारीजानी यांच्या मते, अमेरिका आपले उद्दिष्ट पूर्ण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरली असून, इराणचा प्रतिकार आता अधिक तीव्र होईल. या प्रतिसादाने पश्चिम आशियातील हे युद्ध आता केवळ दोन देशांपुरते मर्यादित न राहता, जागतिक महायुद्धात रूपांतरित होण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
निसर्गाच्या नियमाप्रमाणे आगीने आग विझत नाही, तर ती अधिक भडकते. इराण आणि इस्रायलमधील हा संघर्ष आता ‘आर या पार’च्या लढाईत पोहोचला आहे. इंधन साठे जळत असताना जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडण्याची शक्यता असून, याचे पडसाद आगामी काळात सर्वच देशांच्या राजकारणावर उमटणार, हे निश्चित.