Abhishek Sharma : टी-20 विश्वचषक 2026 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंतेची बातमी समोर आली आहे. सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली असून, पोटातील संसर्गामुळे (Infection) त्याचे वजन घटल्याचा खुलासा खुद्द अभिषेकनेच केला आहे.
नेमकं काय घडलंय?
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत पोहोचल्यानंतर अभिषेक शर्माची प्रकृती खालावली होती. पोटातील गंभीर संसर्गामुळे त्याला दोन दिवस रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. 11 फेब्रुवारीला त्याला डिस्चार्ज मिळाला असला, तरी नामिबियाविरुद्धच्या सामन्यात तो पूर्णपणे तंदुरुस्त दिसत नव्हता. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या घरी आयोजित कार्यक्रमातूनही त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने लवकर निघावे लागले होते.
अर्शदीपसोबतचा तो ‘व्हिडिओ’ व्हायरल
सोशल मीडियावर सध्या अर्शदीप सिंग आणि अभिषेक शर्मा यांचा एक मजेशीर पण काळजी व्यक्त करणारा व्हिडिओ चर्चेत आहे. यात अर्शदीपने “तू बारीक झालास का?” असे विचारले असता, अभिषेक हसत म्हणाला, “हो, आता तब्येत ठीक आहे, पण (आजारपणामुळे) थोडं वजन कमी झालंय.” यावरून अभिषेकला या आजारपणाचा किती त्रास झाला असावा, याचा अंदाज चाहत्यांना येत आहे.
Update on Abhishek Sharma by Arshdeep Singh, good to know he’s doing good ? pic.twitter.com/MbvOzMChmg — ?????? (@ManishSRH) February 12, 2026
पाकिस्तानविरुद्ध खेळणार की नाही? सस्पेन्स कायम
पाकिस्तानविरुद्धच्या मोठ्या सामन्यात अभिषेक मैदानावर उतरणार का? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने स्पष्ट केले आहे की, अभिषेक अजून 100 टक्के फिट नाही. विश्वचषकाचे महत्त्व पाहता, बीसीसीआय त्याच्या पुनरागमनाबाबत कोणतीही घाई करण्याच्या मनस्थितीत नाही. दिल्लीत तो सराव करताना दिसला असला, तरी अंतिम अकरामध्ये त्याला स्थान मिळते की त्याला आणखी विश्रांती दिली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.